

सोलापूर : गेल्या तीन वर्षांपासून महापालिकेवर प्रशासक आहे. न्यायालयाने चार महिन्यात निवडणुका घेण्याचे आदेश दिल्यानंतर सर्व राजकीय पक्षांकडून निवडणुकीची तयारी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर साधारण दिवाळीनंतर महापालिकेची निवडणूक होण्याची शक्यता आहे.
गत पंचवार्षिक निवडणुकीत सोलापूर महापालिकेत काँग्रेसचे चौदा नगरसेवक निवडून आले होते. तर एकजण स्वीकृत असे एकूण 15 नगरसेवक होते. त्यापैकी चारजणांनी पक्षाची साथ सोडली आहे. तर दोन माजी नगरसेवक अलिप्त आहेत. येणार्या महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसची वाट खडतर असल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये होत आहे.
सन 2017 च्या महापालिका निवडणुकीत काँग्रेस 14 नगरसेवक निवडून आले होते. त्यातील वैष्णवी करगुळे हिने विधानसभा निवडणुकीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. बाबा मिस्त्री यांनी प्रहार पक्षातून विधानसभा निवडणूक लढविली आहे. तौफिक हत्तुरे यांनी एमआयएम पक्षात तर स्वीकृत नगरसेवक यु.एन. बेरिया यांनी शरदचंद्र राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला आहे. तसेच माजी आ. दिलीप माने गटाचे माजी नगरसेवक प्रिया माने, शिवा बाटलीवाला हे सध्या अलिप्त असून, महापालिका निवडणुकीत ते इतर पक्षात प्रवेश करणार की, काँग्रेस पक्षातूनच निवडणूक लढणार हे निवडणुकीवेळी कळणार आहे.
परंतु सध्या दोन्ही माजी नगरसेवक अलिप्त भूमिका घेत असल्याचे दिसत आहे. दरम्यान, सन 2017 च्या महापालिका निवडणुकीत भाजपचे 49 नगरसेवक निवडून आल्याने महापालिकेवर भाजपची सत्ता होती. मात्र, सध्या अनेक पक्षातील माजी नगरसेवक, विविध नेत्यांचा भाजपकडे ओढा असल्याने येणार्या निवडणुकीत काँग्रेसची वाट खडतर असल्याची चर्चा होत आहे.
काँग्रेसचे महापालिकेत एकेकाळी 42 पेक्षा जास्त नगरसेवक निवडून आले होते. मात्र, पक्षातील गटबाजी आणि इतर कारणांमुळे सन 2017 मध्ये फक्त 14 नगरसेवक निवडून आले होते. त्यामुळे पक्षाला महापालिकेच्या सत्तेपासून दूर रहावे लागले. या काळात पक्षाची मोठी वाताहत झाली आहे. ती भरुन काढण्यासाठी सर्व नेते एकत्रित येऊन जुन्या-नव्या नेत्यांना निवडणुकीत संधी देण्याची गरज आहे.
चेतन नरोटे, विनोद भोसले, परवीन इनामदार, प्रवीण निकाळजे, अनुराधा काटकर, नरसिंग कोळी, फिरदोस पटेल, रियाज हुंडेकरी व श्रीदेवी फुलारे हे नऊजण सध्या काँग्रेससोबत आहेत.