

सोलापूर : नुकताच पावसाळा संपलेला आहे. पावसाळ्यात येथील अनेक रस्त्यांवर असंख्य खड्डे पडले असून त्याची दुरावस्था झालेली आहे. एकाही रस्त्यावरून सहजासहजी ये-जा करणे अवघड झाले आहे. या खराब रस्त्यासह अनेक ठिकाणी रस्त्यावरील गटारीचे चेंबर तुंबल्याने हे पाणी रस्त्यावरून वाहतांना दिसते. हे या भागातील नागरिकांसाठी नित्याचीच आहे. हे वास्तव चित्र पाहण्यासाठी पालिकेच्या आयुक्तांनी सकाळच्या दरम्यान फेरफटका मारल्यास नक्कीच त्यांनाही हे चित्र दिसणार आहे.
जुळे सोलापूर भागात शेकडो नगराची वसाहती झालेल्या आहेत. जुना विजापूर नाक्यापासून पुढील वसाहत ही हद्दवाढ भाग आहे. तसेच, होटगी व विजापूर रोड या परिसरात एका बाजूला इंदिरा नगर, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, हरळय्या, माशाळ वस्ती, कमला, सोनी, कुमार स्वामी, कित्तूर चन्नम्मा, आदित्य यासह आदी वसाहती आहेत. तर दुसऱ्या बाजूला भारती विद्यापीठ, संतोष नगर नवीन व जुना, वामन, मीरा पिठाची गिरणी, रेणुका नगरी, प्रियंका, प्रल्हाद, वैष्णवी, सवेरा असे असंख्य नागरी वसाहती आहेत. या वसाहतीत गेल्या अनेक दिवसापासून रस्ते नाहीत. असलेल्या रस्त्यावर असंख्य खड्डे आहेत. खड्डे चुकवताना जीवावरही बेतण्याची स्थिती या भागातील रस्त्यांची झाली आहे. तर रस्त्याच्या मध्यभागी असलेले गटारी चेंबर तुबल्या आहेत. त्यातील सांडपाणी रस्त्यावरूनच वाहते. पर्यायाने नागरिकांना याच पाण्यातून ये-जा करावी लागते.
पावसाळ्यात जेथे पाणी होते. ते पाहण्यासाठी पालिका आयुक्त सकाळीच गेले होते. तेव्हाच तेथील परिस्थिती त्यांना प्रत्यक्ष दिसली. रस्त्यावर खड्डे पडलेलेच होते. यंदाच्या मुसळधार पावसाळ्यात पुन्हा त्यात भर पडली. शिवाय, काही ठिकाणी रस्त्यावरील गटारीचे चेंबर तुंबून पाणी रस्त्यावर येते. याच, पाण्यातून नागरिकांना ये जा करावी लागते. खड्ड्यासह या सांडपाण्याचा नागरिकांना त्रास होतो, अशी प्रतिक्रिया या परिसरातील अनेक नागरिकांनी व्यक्त केली आहे.