

सोलापूर : महागाईच्या झळा आता सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करत आहे. कारण कपडे इस्त्री करणेही आता महागले आहेत. लॉन्ड्री व्यावसायिकांनी दरवाढ केल्याने ग्राहकांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. गल्लीबोळात काही ठिकाणी 20 रुपयांत इस्त्री केली जात आहे. तर काही शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी पॅन्ट-शर्ट इस्त्री करण्यासाठी 30 रुपये आकारले जात आहेत. केवळ स्टार्च करण्यासाठी तब्बल 100 रुपये मोजावे लागत आहे.
या दरवाढीमागे अनेक कारणे व्यावसायिकांडून सांगण्यात आली. वाढते वीज दर, कोळसा आणि इतर इंधनाच्या किमतीत झालेली वाढ यामुळे लॉन्ड्री व्यावसायिकांचा खर्च लक्षणीय वाढला आहे. याशिवाय, इस्त्रीची उपकरणे, त्यांची देखभाल आणि डिटर्जंट, हँगर्स यांसारख्या आवश्यक साहित्याच्या खर्चातही मोठी वाढ झाली आहे. या सर्व गोष्टींमुळे आपला व्यवसाय चालवण्यासाठी आणि किमान नफा मिळवण्यासाठी लॉन्ड्री व्यावसायिकांना दर वाढवणे भाग पडले आहे. सध्याची परिस्थिती पाहता नजीकच्या काळात हे दर कमी होण्याची शक्यता कमीच आहे. सर्वसामान्यांचे हाल आणखी बिकट होण्याची चिन्हे आहेत.
दर
पॅन्ट शर्ट इस्त्री- 30
साडी इस्त्री- 80
शर्ट पॅन्ट स्टार्च- 100
साधा शर्ट पॅन्ट स्टार्च- 90
साधा शर्ट विजार स्टार्च- 80
साडी स्टार्च- 250