

पंढरपूर : शासनाने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस दि. 17 सप्टेंबर ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती दि. 2 ऑक्टोबर या कालावधीमध्ये सेवा पंधरवडा म्हणून राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या अनुषंगाने पंढरपूर तालुक्यात सेवा पंधरवडा साजरा करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार सचिन लंगुटे यांनी दिली.
सेवा पंधरवड्यात दि. 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत विवादग्रस्त व अविवादग्रस्त नोंदी निर्गत करण्यासाठी शिबिराचे आयोजन केले आहे. या विवादग्रस्त नोंदी 10 टक्के, अविवादग्रस्त नोंदी 5 टक्क्यांवर आणण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियानात सर्व गावांमध्ये 7/12 वाचन करण्यात येणार आहे. गाव तिथे स्मशानभूमी अभियान अंतर्गत ज्याठिकाणी स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध नाही. तेथे खासगी जागा अथवा शासकीय जागा उपलब्ध करुन देण्याबाबत कार्यवाही करण्यात येणार आहे.
तसेच शासकीय जमीन बँकांचे डिजिटलायझेशन, विविध जातीचे प्रलंबित प्रमाणपत्र वाटप करणे, कुणबी जातीच्या नोंदी शोधणे, अनुकंपा भरतीची कार्यवाही पूर्ण करणे. व्हीजेएनटी जमातीसाठी विविध प्रकारचे दाखले देण्यासाठी शिबिराचे आयोजन, पाणंद रस्ते अतिक्रमण मुक्त करणे, रस्ते अदालत आयोजन करुन शेत रस्त्यांची प्रलंबित प्रकरणे निकाली काढणे, कुठल्याही प्रकारचा वाद नाही. अशा रस्त्यांची नोंद इतर अधिकारात घेणे.
तसेच पाणंद रस्त्यांना क्रमांक देणे, तृतीयपंथी- एकट्या महिला व आत्महत्याग्रस्त शेतकरी यांच्यासाठी विविध योजनांचा लाभ देणे, महा-ई- सेवा केंद्र बंद असलेल्या ठिकाणी नवीन केंद्र वाटप करणे, आयुषमान भारत कार्ड वाटपासाठी शिबिराचे आयोजन करणे. असे विविध कामकाज करण्यात येणार आहेत.
विविध योजनांचा लाभ घ्या...
सेवा पंधरवड्यात दि. 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत पंढरपूर तालुक्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी या अभियानात सहभाग नोंदवून विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार सचिन लंगुटे यांनी केले आहे.