

सोलापूर : केंद्राच्या महिला व बालविकास मंत्रालयाकडून बालविवाहमुक्त भारत या राष्ट्रव्यापी अभियानांतर्गत राज्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांमध्ये बालविवाहाच्या विरोधात जनजागृती मोहीम राबवली जाणार आहे.
या उपक्रमातून ४७ च्या ‘विकसित भारताचे स्वप्न साकारताना २०३० पर्यंत देश बालविवाहमुक्त करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या मोहिमेच्या माध्यमातून बालविवाहाचे प्रमाण १० टक्क्यांनी खाली आणण्यासाठी विशेष कृती आराखडा तयार केला आहे. केवळ शाळांपुरते मर्यादित न राहता गावपातळीवरील ग्रामपंचायती, विविध धर्मांचे धर्मगुरू आणि विवाह लावणारे पुरोहित व इतर घटकांनाही या मोहिमेत सामील करून घेतले जात आहे. बालविवाह प्रतिबंध कायद्याची कडक अंमलबजावणी करत १८ वर्षांखालील मुलीचा आणि २१ वर्षांखालील मुलाचा विवाह लावणाऱ्यांवर कायदेशीर बडगा उगारला जात आहे.
अल्पवयीन विवाहाचे भयावह वास्तव आणि मदत कक्ष
जीवन उद्ध्वस्त करणारा निर्णय : शरीर आणि मन परिपक्व होण्याआधीच मातृत्व लादले गेल्याने माता व बालमृत्यूचे प्रमाण वाढते. शिक्षणाची दारे बंद झाल्याने मुलींचे भविष्य अंधारात जाते आणि घरगुती हिंसाचाराचा धोका निर्माण होतो.
एका क्लिकवर तक्रार सुविधा : बालविवाहाची माहिती मिळताच नागरिक किंवा पीडितांना थेट तक्रार करता यावी, यासाठी सरकारने विशेष ‘बालविवाहमुक्त भारत पोर्टल’ सुरू केले असून तिथे प्रत्येक जिल्ह्यातील प्रतिबंधक अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक उपलब्ध आहे.