

महूद : सांगोला तालुक्यातील चिकमहूद अंतर्गत असणाऱ्या ननवरे मळा येथील महादेव ननवरे यांच्या कुटुंबीयांना तलवार आणि पिस्तुलाचा धाक दाखवून चोरट्यांनी सुमारे पंधरा तोळ्यांचे दागिने पळवून नेले आहेत. ही घटना शुक्रवारी (ता. 28) मध्यरात्री घडली.
राज्य परिवहन महामंडळाकडील निवृत्त वाहक महादेव सुखदेव ननवरे हे चिकमहूदअंतर्गत असणाऱ्या ननवरे मळ्यातील शेतात असणाऱ्या घरात राहतात. शुक्रवारी (ता.28) मध्यरात्री दीड ते दोन वाजण्याच्या सुमारास चार चोरट्यांनी घराच्या मुख्य दरवाजाचा कडी कोयंडा तोडून त्यांच्या घरात प्रवेश केला. महादेव ननवरे व त्यांच्या पत्नीस पिस्तूल व तलवारीचा धाक दाखवून अंगावरील व घरातील सोन्याच्या दागिन्यांची मागणी केली. तोंडाला रूमाल बांधलेल्या चोरट्यांनी धक्काबुक्कीही केल्याने महादेव ननवरे खाली पडले. चोरट्यांनी महादेव ननवरे यांच्या पत्नीच्या अंगावरील सोने काढून घेतले. घरातील कपाटामध्ये ठेवलेले सुमारे पंधरा तोळ्यांचे दागिने घेऊन चोरटे पसार झाले. घटनास्थळी सांगोल्याचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक भारत वाघे यांनी भेट दिली. तपासकामासाठी श्वान पथक आणि ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले.
महादेव ननवरे यांच्या घरावर विविध ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. मात्र ही यंत्रणा चालू ठेवण्यासाठी असणारा नेट रिचार्ज काही दिवसांपूर्वी संपला होता. हा रिचार्ज न केल्यामुळे या घटनेचे चित्रीकरण उपलब्ध नाही.
ननवरे मळ्याला लागूनच माळशिरस तालुक्यातील कोळेगाव हद्द येते. दोन दिवसांपूर्वी काही चोरट्यांनी कोळेगाव शिवारात चोरीचा प्रयत्न केला होता; मात्र त्या ठिकाणी चोरीचा प्रयत्न फसला. दोन दिवसांनंतर कोळेगाव शिवाराजवळ असणाऱ्या ननवरे मळा येथे मात्र चोरांनी शुक्रवारी रात्री ही जबरी चोरी केली आहे.