

अक्कलकोट: तालुक्यातील चिक्केहळ्ळी येथील साठवण तलावाच्या दुरुस्तीचे काम पूर्ण होण्याआधीच त्याला मोठ्या भेगा पडल्या आहेत. यामुळे तलाव फुटून मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता होती, पण परिसरातील नागरिकांनी वेळीच दाखवलेल्या सतर्कतेमुळे हा अनर्थ टळला. सध्या तलावातून पाणी काढून धोक्याची शक्यता कमी करण्याचे काम सुरू आहे.
या तलावाचे काम अजून पूर्ण झालेले नसतानाच त्याला भेगा पडल्याने, हे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याची चर्चा सुरू आहे. या घटनेची माहिती मिळताच तहसीलदार विनायक मगर, पोलीस आणि पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या माहितीनंतरही प्रशासकीय हालचाली वाढल्या.
गेल्या काही दिवसांपासून सततच्या पावसामुळे अक्कलकोट तालुक्यातील धरणे आणि तलाव भरले आहेत. गुरुवारी रात्री उशिरा चिक्केहळ्ळी तलावाला मोठ्या भेगा पडल्याचे स्थानिक शेतकरी आणि कामगारांच्या लक्षात आले. त्यांनी लगेच ग्रामस्थांना याची माहिती दिली. यामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला. तात्काळ आमदार, तहसीलदार आणि पोलिसांना याची माहिती देण्यात आली. प्रशासनाने तातडीने दखल घेऊन सांडव्याला मोठा करून त्यातून पाणी बाहेर काढण्यास सुरुवात केली. यामुळे मोठा धोका टळला, अन्यथा हजारो हेक्टर शेती आणि तीन गावांचे मोठे नुकसान झाले असते.
या घटनेच्या वेळी पोलीस उपनिरीक्षक ननावरे, पोलीस हवालदार सुरवसे, मंडल अधिकारी शेख, तलाठी पांढरे, ग्रामसेवक, पोलीस पाटील, कोतवाल आणि पाटबंधारे विभागाचे अधिकारी उपस्थित होते. तसेच, चिक्केहळ्ळी आणि सोंगळगी गावातील शेतकरीही मोठ्या संख्येने घटनास्थळी जमले होते.
विशेष म्हणजे, चार वर्षांपूर्वीही याच तलावाला याच ठिकाणी भेगा पडल्या होत्या. त्यावेळी दुरुस्तीसाठी शासनाने ९ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. आता पुन्हा त्याच ठिकाणी भेगा पडल्याने कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
चिक्केहळ्ळी, संगोगी (आ), हत्तीकणबस आणि तोरणी यांसारख्या गावांची हजारो हेक्टर जमीन या तलावाच्या पाण्यावर अवलंबून आहे. तसेच, अनेक गावांना याच तलावातून पाणीपुरवठा होतो.
जिल्हा जलसंधारण अधिकारी आर. डी. क्षीरसागर यांनी सांगितले की, "या कामाचे बिल अजून पूर्णपणे देण्यात आलेले नाही आणि त्याची संपूर्ण जबाबदारी ठेकेदारावर आहे. ठेकेदाराकडूनच हे काम पुन्हा करून घेतले जाईल."
चिक्केहळ्ळीचे माजी सरपंच सुधीर मचाले यांनी या कामाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. "या कामासाठी शासनाच्या निधीचा दुरुपयोग झाला आहे. पाटबंधारे विभागाने याकडे दुर्लक्ष केले. जर नागरिकांनी वेळीच पाहिले नसते, तर मोठा धोका झाला असता. या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई होणे आवश्यक आहे," असे ते म्हणाले.