

पंढरपूर : श्री विठ्ठल मूर्तीच्या चरणाची झीज होत आहे. त्यानुसार रासानिक प्रक्रिया करण्याबाबत शासनाच्या विधी व न्याय विभागाकडून मंजुरी मिळाली आहे. याबाबत लवकरच जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली सल्लागार परिषद, स्थानिक लोकप्रतिनिधी, स्थानिक महाराज मंडळी यांच्या संघटनांसमवेत एक संयुक्त बैठक घेण्यात येणार आहे. रासायनिक लेपन केल्यानंतर चरणदर्शन बंद ठेवावे लागणार असल्यामुळे माघ वारीपूर्वी विठ्ठल मूर्तीच्या चरणारवर रासायनिक लेपन करावे लागणार आहे.
स्पर्श दर्शन वाढल्याने विठ्ठल मूर्तीच्या चरणाची झीज होत असल्याचे वृत्त दै. ‘पुढारी’ने प्रसिध्द केले होते. या वृत्ताची दखल घेऊन विधी व न्याय विभागाने रासायनिक लेप करण्यास परवानगी दिली आहे. याबाबतचा अहवाल मंदिर समितीला प्राप्त झाला आहे.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल- रुक्मिणीच्या दर्शनासाठी दररोज लाखो भाविक येतात. वर्षाभरातील चार मोठ्या यात्रेतून वर्षाकाठी सुमारे सव्वा कोटीहून अधिक भाविक दर्शनासाठी येतात. दररोज हजारो भाविकांकडून चरणस्पर्श होतो त्यामुळे विठ्ठल मूर्तीच्या चरणाची झीज होऊ लागली आहे. चरणाची होणारी झीज थांबवण्यासाठी एकमेव उपाय म्हणून रासायनिक लेप लावण्यात येतो. यापूर्वी चारवेळा रासायनिक लेप लावण्यात आला आहे.
दर पाच वर्षानी श्री विठ्ठलाच्या मूर्तीच्या चरणावर रासानिक लेप करण्याची आवश्यकता असल्याचे पुरातत्व विभागाने सुचविलेे आहे. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाच्या तज्ज्ञ अधिकाऱ्यांनी फेब्रुवारी 2025 मध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मूर्तींची प्रत्यक्ष पाहणी करून सविस्तर लेखी अहवाल मंदिर समितीकडे सादर केला होता. याअहवालास श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीची मंजुरी मिळाल्यानंतर हा अहवाल शासनाकडे मंजुरीसाठी सादर करण्यात आला होता.