

सोलापूर : आचार्याचे काम करणाराच अट्टल मोटारसायकल चोर निघाला. जोडभावी पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने त्याला अटक करून मोटारसायकल चोरीचे पाच गुन्हे उघडकीस आणले. त्याच्याकडून पावणेदोन लाखांच्या मोटारसायकली जप्त केल्या.
जोडभावी पोलिस स्टेशनचे पोलिस कॉन्स्टेबल दादासाहेब सरवदे यांना पेट्रोलिंग करताना जोतिबा केरबा मानकर (रा. बागवान नगर, एमआयडीसी) हा तळे हिप्परगा येथे पत्र्याच्या शेडमध्ये चोरीच्या मोटारसायकली आणून विकत असल्याची खबर मिळाली होती. त्याठिकाणी पोलिसांनी छापा टाकून त्यास ताब्यात घेतले, तेथून चार मोटारसायकली जप्त केल्या.
जोतिबा मानकर हा आचार्याचे काम करतो. ते करत असतानाच तो मोटारसायकलची चोरी करत होता. दुसर्या प्रकरणात आयप्पा माळप्पा पारट (रा. घोंगडे वस्ती, भवानी पेठ) हा लिंगायत स्मशानभूमी येथे चोरीची मोटारसायकल विक्री करण्यासाठी येत असल्याचे पोलिसांना समजले. त्या अनुषंगाने सापळा रचून त्यास पकडण्यात आले. त्याच्याकडून चोरी केलेली एक मोटारसायकल जप्त केली. दोघांकडून जोडभावी पोलिस ठाण्यातील चार आणि मोहोळ पोलिस ठाण्यातील एक असे पाच गुन्हे उघडकीस आणले.
ही कामगिरी पोलिस आयुक्त एम. राज कुमार, पोलिस उपायुक्त विजय कबाडे, सहायक पोलिस आयुक्त प्रताप पोमण, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुहास चव्हाण, शबनम शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक पडसळकर, महाडिक, खाजप्पा आरेनवरू, शीतल शिवशरण, विठ्ठल पैकेकरी, दादासाहेब सरवदे, बसवराज स्वामी, अभिजित पवार, स्वप्निल कसगावडे, दत्ता मोरे, यशसिंह नागटिळक, दत्ता काटे, विठ्ठल काळजे यांनी पार पाडली.