

पंढरपूर : श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीच्या आषाढीवारी संदर्भात सुरू असलेल्या बैठकीत सामाजिक कार्यकर्त्यांनी गोंधळ घालत मंदिर समिती बरखास्त कण्याची मागणी केली. तसेच बीव्हीजी कंपनीचा ठेका रद्द करावा. ठेकेदारीवर पाच कोटी रुपये खर्च करण्यापेक्षा सेवाभावी तत्वावर भाविकांना मोफत सेवा करण्याची संधी द्यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी यावेळी केली.
आषाढी यात्रेच्या पूर्व तयारीची बैठक श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या भक्त निवासात शनिवारी (दि. 7) मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत सामाजिक कार्यकर्त्यांनी गोंधळ घालत मंदिर समिती बरखास्त करण्यात यावी, अशी मागणी केली. मुदत संपूनही समिती कार्यरत आहे, भाविकांच्या हिताचे निर्णय घेण्यात येत नाहीत, मंदिर समितीला सुरक्षा रक्षक पुरवण्याचे काम करणार्या बीव्हीजी कंपनीला दिलेला ठेका रद्द करावा, टेंडर प्रक्रिया राबवू नये, भाविकांचे पाच कोटी रुपये ठेकेदाराच्या घशात घालू नये, अशी मागणी यावेळी करत सामाजिक कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला.
भाविकांना मंदिरात मोफत सेवा करण्याची संधी द्यावी, भाविक सेवा करण्यासाठी तयार आहेत. पंढरपूरकर सेवा करण्यासाठी तयार आहेत. इतकेच काय राज्यभरातील भाविकही मोफत सेवा करण्यासाठी तयार आहेत. मग पाच कोटींचा ठेका देण्याची गरज काय, असा प्रश्न सामाजिक कार्यकर्त्यांनी यावेळी उपस्थित केला. यावेळी कार्यकर्त्यांनी समिती विरोधात जोरदार घोषणाही दिल्या. यामुळे काही वेळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते ह. भ. प. दत्ता महाराज काळे, गणेश अंकुशराव, संतोष कवडे, संतोष बंडगर, सूरज राठी, भास्कर तात्या जगताप, मुन्नाराजे भोसले, विनोद लटके आदी उपस्थित होते.