

सोलापूर : पंढरपुरात श्री विठ्ठल-रुक्मिणी दर्शनासाठी राज्यासह देशभरातून येणाऱ्या भाविकांना पुरेशा सुविधा मिळाव्यात यासाठी तसेच गोमाता संवर्धनासाठी राज्य शासनाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. त्यामध्ये पंढरपूर येथील यमाई तलावालगत असणारी गट नं. १६१ मधील ३ हेक्टर १२ गुंठे इतकी शासकीय जमीन श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीला प्रदान करण्यास मान्यता देण्यात आली आहे. मंदिर समितीच्या कार्यकारी अधिकाऱ्यांनी या जागेची मागणी केली होती.
या निर्णयामुळे पंढरीत येणाऱ्या भाविकांची गैरसोय टळून त्यांना श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेता येणार आहे. मंगळवार, दि. १६ रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मंदिर समितीच्या मागणीची चर्चा पुढे आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा निर्णय घेतला आहे.
भाविकांना आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देणे आणि ‘गोमाता पालन-संवर्धन केंद्र’ या ठिकाणी उभारण्यात येणार आहे.