

पंढरपूर : वीर, भीमा नदी खोर्यात गेल्या आठवडाभरापासून झालेल्या मुसळधार पावसामुळे नीरा नदीला पूर आला आहे. नीरा नदीचे पाणी भीमा नदीला मिळत असल्याने भीमा नदीला पूरसद़ृश परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे माळशिरस तालुक्यातील नीरा, भीमा नदीवरील कोल्हापूर पद्धतीचे बंधारे पाण्याखाली गेले आहेत. पंढरपूर येथील दगडी पूलही पाण्याखाली गेला आहे. चंद्रभागा नदीपात्रातील पुंडलिक मंदिरासह इतर मंदिरांना पाण्याने वेढा घातला आहे.
भाविकांनी नदीपात्रात स्नानासाठी जाऊ नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. पाण्याची वाढती पातळी लक्षात घेता प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. पूरपरिस्थिती लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्कच्या सूचना दिल्या आहेत.
दरम्यान, नीरा व भीमा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने सध्या दगडी पुलावर 40 हजार क्युसेकने पाणी वाहत आहे. भाविक नदीपात्रात आंघोळीसाठी उतरून जीवितास धोका होऊ नये म्हणून नदीच्या कडेला बॅरिकेटिंग केले आहे. प्रशासक तथा उपविभागीय अधिकारी सचिन इथापे, मुख्याधिकारी, डॉ. प्रशांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर नगरपरिषदेची यंत्रणा व पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. नगरपालिकेची अग्निशमन दल जवान बोट घेऊन दगडी पुलाजवळ व नदीपात्रात बोटीद्वारे गस्त घालत आहेत.
यावेळी पंढरपूर नगर परिषदेचे उपमुख्याधिकारी अँड. सुनील वाळुजकर, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता हरसुरे, अग्निशमन अधिकारी संभाजी कार्ले, आरोग्य अधिकारी तोडकर, अग्निशमन दल यंत्रणा व पोलिस यंत्रणा कामाला लागली आहे. तसेच लगत असलेल्या व्यास नारायण झोपडपट्टी व अंबाबाई पटांगण झोपडपट्टी येथील नागरिकांना सतर्क राहण्याबाबत स्पीकरद्वारेही सूचना देण्यात येत आहेत.
माळशिरस तालुक्यातील कुरभावी येथील चार व पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे येथील तीनजण नदीपात्रात अडकले होते. त्या सगळ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात जिल्हा प्रशासनाला यश आले आहे. भीमा नदीला पूर आला आहे. त्यामुळे नागरिकांनी नदीपात्रात जाऊ नये. स्थानिक प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे.
कुमार आशीर्वाद, जिल्हाधिकारी.