Solapur Drought : कोरडी विहीर, वाळलेला ऊस, करपलेल्‍या तुरीची पाहणी

उत्तर सोलापूर, मंगळवेढा, सांगोला तालुक्‍यांत केंद्रीय पथकाचा दौरा
Solapur Drought : कोरडी विहीर, वाळलेला ऊस, करपलेल्‍या तुरीची पाहणी
Published on: 
Updated on: 

सोलापूर : केंद्रीय पथकाकडून उत्तर सोलापूर, मंगळवेढा आणि सांगोला तालुक्‍यातील पिकांची पाहणी केली. यावेळी उत्तर सोलापूर तालुक्‍यातील करपलेली तूर, मंगळवेढा तालुक्‍यातील आटलेले हातपंप, विहीर आणि सांगोला तालुक्‍यात वाळलेल्‍या उसाची पाहणी केली आहे.

केंद्र शासनाच्या केंद्रीय पथकाने सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करून पीक नुकसान, पिण्याच्या पाण्याची टंचाई, भूजल पातळी, जनावरांसाठी चारा व पाण्याची उपलब्धता तसेच रब्बी हंगामाच्या शक्यतांचा आढावा पाहणी दौऱ्यांच्‍या दुसऱ्या दिवशी म्‍हणजेच शनिवारी (दि.१०) घेतला. उत्तर सोलापूर तालुक्यातील बेलाटी, मंगळवेढा तालुक्यातील विविध गावांमध्ये पथकाने शेतकऱ्यांशी संवाद साधून दुष्काळामुळे झालेल्या नुकसानीची माहिती जाणून घेतली.

पावसातील दीर्घ खंडामुळे तूर व अन्य पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, काही भागांतील विहिरी आणि साठवण तलाव कोरडे पडल्याचे निदर्शनास आले. चारा व पाण्याच्या टंचाईमुळे पशुपालन व्यवसायावरही गंभीर परिणाम झाला आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी शासनाकडून जास्तीत जास्त आर्थिक मदत वेळेत मिळावी, अशी मागणी केंद्रीय पथकाकडे केली. या पथकात कृषी व शेतकरी कल्याण विभागाच्या पीक विभागाचे संचालक डॉ. के. पोनुसामी, पेयजल व स्वच्छता विभागाचे टीम लीडर अबसार अहमद खान, अन्न व सार्वजनिक वितरण विभागाचे सहायक संचालक सुमित शर्मा यांचा समावेश आहे.

रब्बी हंगामाचीही चिंता

केंद्रीय पथकाने उत्तर सोलापूर तालुक्यातील बेलाटी येथील शेतकरी सुभाष जाधव यांच्या शेताला भेट देऊन नुकसानग्रस्त पिकाची पाहणी केली. जूनअखेर पेरणी झाल्यानंतर पाऊस न झाल्याने परिसरात पावसाचा सुमारे ३८ दिवसांचा खंड पडला. परिणामी, तूर पीक पूर्णपणे नष्ट झाल्याची माहिती जाधव यांनी पथकाला दिली. तसेच पुढील रब्‍बी हंगामही धोक्‍यात असल्‍याचे सांगितले.

पशुपालन व्यवसाय अडचणीत

केंद्रीय पथकाने गोणेवाडी येथील गोट फार्मला भेट देऊन दुग्ध व्यवसायाची स्थिती जाणून घेतली. या फार्मच्या पशुपालकांकडे २८ गायी असून, दुष्काळामुळे जनावरांसाठी चारा आणि पाणी मिळविणे कठीण झाल्याचे त्यांनी सांगितले. पूर्वी दररोज सुमारे १५० लिटर दूध उत्पादन होते. मात्र, आता ते घटून ८० लिटर झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news