

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा
अक्कलकोट तालुक्यातील मैंदर्गी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेवर ‘मुख्यमंत्री स्वच्छ शाळा, सुंदर शाळे’चे गुणांकन दोन केद्रप्रमुखांनी सिस्पेन्सिलने केले. याविषयी मुख्याध्यापक महांतेश कट्टीमनी यांनी जाब विचारताच केंद्रप्रमुखांनी शाळेतून पळ काढला.
केंद्रप्रमुखांकडून सिस्पेन्सिलनने गुणांकन करुन शाळेचे गुण कमी दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेने अक्कलकोट गटशिक्षणाधिकारी, प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांना निवेदन दिले आहे. अक्कलकोट तालुक्यातील मैंदर्गी मुली शाळेत सलगर व उडगी केंद्राच्या केंद्रप्रमुखांनी तालुका पातळीवरील ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ पडताळणीसाठी आले होते. वर्गात जाऊन गुणवत्ता स्वच्छतेबद्दल निरीक्षण करतो म्हणून वर्गावर गेले. मुख्याध्यापकांना वर्गावर सोबत येण्यास मनाई केली. सर्व फॉर्म, गुणतक्ता सिस्पेन्सिलने लिहिले तसेच मुख्याध्यापकांची सही करा, असे सांगितले. मुख्याध्यापकांनी सही देतो, मात्र पेनचा वापर करुन गुण द्या, असे सांगितले. त्यानंतर आम्हाला अधिकार नाही, समितीचे सदस्य आम्ही नाही, आम्हाला पोच देता येत नाही. अधिकार नसताना तुम्ही शाळेत का आला, असे विचारल्यावर केंद्रप्रमुखांनी पळ काढला.