

सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी रविवारी (दि. 27) शहरातील एक आणि जिल्ह्यातील सात मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. त्या सर्व केंद्रांवर पोलिस बंदोबस्त आणि सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक तथा निवडणूक अधिकारी किरण गायकवाड यांनी दिली.
गायकवाड म्हणाले, बाजार समितीच्या 18 जागांसाठी 70 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यासाठी आठ केंद्रांवर मतदान घेण्यात येणार आहे. सोलापूर शहरातील सिध्देश्वर प्रशाला येथे सात बूथ राहतील. त्यामुळे येथे मोठा पोलिस बंदोबस्त ठेवला आहे. तसेच उत्तर सोलापूर व दक्षिण सोलापूर तालुक्यातील तिर्हे, नान्नज, निंबर्गी, मंद्रुप, आहेरवाडी, वळसंग, बोरामणी या सात केंद्रांवर ग्रामीण भागातील मतदान होणार आहे.
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी यंदा चुरशीने मतदान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मतदान केंद्रांवर कोणताही गैरप्रकार होऊ नये, यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे आणि एक महिला, एक पुरुष पोलिस कर्मचार्यांचा बंदोबस्त लावण्यात येणार आहे.
श्री सिध्देश्वर शेतकरी विकास पॅनल आणि श्री सिध्देश्वर बाजार समिती परिवर्तन पॅनल या दोन पॅनलमध्ये बाजार समितीची निवडणूक होत आहे. दोन्ही पॅनलकडून सभा, बैठका, उमेदवारांच्या प्रत्यक्ष गाठी-भेटी घेऊन प्रचाराचा धुराळा उडविला आहे. तो प्रचार शनिवारी (दि. 26) सकाळी आठपासून बंद करण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधकांनी दिले आहेत. त्यामुळे शनिवारी सकाळपासून प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत.
बाजार समितीच्या निवडणुकीसाठी आठ मतदान केंद्र आहेत. त्या मतदान केंद्रांवर 125 कर्मचारी उपस्थित राहतील. तसेच 15 कर्मचार्यांना राखीव ठेवले आहे. त्यामुळे एकूण 140 कर्मचार्यांची फौज मतदान केंद्रांवर उपस्थित असेल.
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची मतमोजणी सोमवारी (दि. 28) होटगी रोडवरील आप्पासाहेब काडादी मंगल कार्यालयात होणार आहे. सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीस सुरुवात होणार असल्याची माहिती निवडणूक अधिकारी गायकवाड यांनी दिली.