

सोलापूर : अक्कलकोट रोड एमआयडीसी येथील सेंट्रल टेक्स्टाईल या टॉवेल कारखान्याला लागलेल्या आगीमध्ये आठजणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी आता कारखान्याच्या तीन मालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील हाजी उस्मानभाई हशमभाई मन्सुरी हे मयत आहेत.
18 मे रोजी अक्कलकोट रोड एमआयडीसी येथील सेंट्रल टेक्स्टाईल या टॉवेल कारखान्याला भीषण आग लागली होती. कारखान्यात राहणार्या मालकांसह आठजणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यामुळे सोलापुरात खळबळ उडाली होती.
कारखान्याची आग विझवताना अग्निशामक दल तसेच इतर यंत्रणांना मोठी कसरत करावी लागली. कारखान्यात केलेल्या अनधिकृत बांधकामामुळे आग विझविण्यासाठी आत जाण्यास अडथळे आले. यामुळे आठजणांना जीव गमवावा लागला. या घटनेचे पडसाद दिल्लीपर्यंत उमटले. घटनेच्या 15 दिवसानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
कारखान्यात अनधिकृत बांधकाम केले आहे. मालक व कामगार यांना राहण्याची परवानगी नसताना ते कारखान्यात राहात होते. सुरक्षिततेची कोणतीही काळजी न घेता निष्काळजी करून आठजणांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याने कारखान्याचे मालक इशरत हनीफ मन्सुरी, हानीफ उस्मानभाई मन्सुरी आणि उस्मानभाई हशमभाई मन्सुरी यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 106 (1) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. यातील उस्मानभाई मन्सुरी हे मयत असून त्यांचा मुलगा हानीफ आणि सून इशरत यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.