

सोलापूर : विवाहिता ही सासरी नांदताना तिला वेळोवेळी मारहाण, जाच करून चारित्र्यावर संशय घेऊन शेअर मार्केट व्यवसायासाठी पाच लाख रुपये घेऊन ये असे म्हणत शारीरिक व मानसिक त्रास देऊन छळ केल्याची घटना सात डिसेंबर 2023 ते 21 ऑक्टोबर 2024 पर्यंत फिर्यादीच्या सासरी घडली.
याप्रकरणी प्रगती ओंकार चव्हाण (वय 26, रा. तेलंगी पाच्छा पेठ) यांच्या फिर्यादीवरून पती ओंकार चव्हाण, सासू शुभदा चव्हाण, सासरे जयदेव चव्हाण, ननंद प्रज्वलिता चव्हाण सर्व (रा. 158 तेलंगी पाच्छा पेठ) यांच्यावर जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी या सासरी नांदताना त्यांना वारंवार किरकोळ कारणावरून वादविवाद, भांडण तंटे मारहाण करणे, व्यवसायासाठी पाच लाख रुपये घेऊन ये, सोने, पिठाची चक्की घेऊन ये त्याशिवाय तुला नांदून घेणार नाही, अशी धमकी देऊन फिर्यादीस नांदविण्यास नकार दिला असे फिर्यादीत नमूद आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल भोगशेट्टी हे करीत आहेत.