

सोलापूर : सोलापूर-मंगळवेढा महामार्गावरील देगाव बसवेश्वर तांडा येथे पेट्रोल पंपावर डिझेल भरण्यासाठी गेलेल्या कार गाडीच्या इंजिनमध्ये शॉर्टसर्किट होऊन गाडीने पेट घेतल्याची घटना शुक्रवारी (दि. 2) घडली. मात्र, चालकाने प्रसंगावधान दाखवून गाडी थांबवली व प्रवासी सुखरूप बाहेर काढले. त्यामुळे मोठी प्राणहानी टळली. गाडी आगीच्या भक्षस्थानी पडली.
मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूर येथून मंगळवेढ्याकडे जाणार्या कार गाडी डिझेल भरण्यासाठी पंपावर नेली. यावेळी डिझेल टाकीच्याजवळ वायरिंगमध्ये शॉर्टसर्किट होऊन गाडीतून धूर निघत असल्याचे चालकाच्या लक्षात आले. चालकाने प्रसंगावधान दाखवून आपली गाडी रोडच्या कडेला उभी केली. तातडीने सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले. प्रवासी बाहेर निघताच गाडी आगीच्या भक्षस्थानी पडली. आमदार उत्तम जानकर यांच्या मुलाची ही गाडी असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. ही घटना शुक्रवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडली.
डिझेल टाकीजवळ शॉर्टसर्किट होऊन धूर येण्यास सुरुवात झाली. यावेळी पेट्रोल पंपावरील कर्मचारी, मॅनेजर यांनी अग्निरोधक यंत्राच्या साह्याने आग विझविण्याचा प्रयत्न केला; पण आगीने रौद्ररूप धारण केले. तत्काळ पंपाचे मॅनेजर धर्मराज जाधव यांनी अग्निशमन दलाला फोन करून गाडी बोलावून घेतली. पण, तोपर्यंत गाडी पूर्णपणे जळाली होती. दैव बलवत्तर म्हणून कोणतीही जीवितहानी झाली नाही.