

सोलापूर : बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने शहरातील सिव्हिल लाईन रोड येथील अनुराधा सोसायटी येथील घरातील सोन्याच्या दागिन्यासह मोबाईल असा सात लाख 40 हजारांचा मुद्देमाल पळविला. ही घटना बुधवारी (दि. 2) रात्री बारा ते गुरुवारी (दि. 3) पहाटे पाचपर्यंत घडली.
याबाबतची फिर्याद मनोहर वसंत शेळके (वय 62, व्यवसाय - माजी सैनिक, रा. अनुराधा सोसायटी, सिव्हिल लाईन रोड) यांनी सदर बझार पोलिस ठाण्यात फिर्यादी दिली. त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. यात अधिक माहिती अशी की, यातील अज्ञात चोरट्याने फिर्यादीच्या घराच्या बेडरूमचा ग्रीलचा दरवाजा उघडला. त्यानंतर लाकडी दरवाजावर असलेल्या खिडकीतून हात घालून लाकडी दरवाजा आतून लावलेले हूक काढून बेडरूममध्ये प्रवेश केला. बेडरूममधील टेबलवर असलेल्या चावीच्या साह्याने बेडरूममधील कपाट उघडले. त्यातील सात लाख 40 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याचे फिर्यादीत नमूद आहे.