

सोलापूर : लोकमंगलचा सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा उद्या रविवारी (दि.16) होणार आहे. यामध्ये 52 जोडपी विवाह बंधनात अडकणार असून, यावेळी वऱ्हाडी मंडळींना बुंदी, चपाती, आमटी अन् भात असे भोजन मिळणार आहे.
लोकमंगल फाऊंडेशनच्या वतीने सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा 46 वा सामूहिक विवाह सोहळा रविवारी सायंकाळी 5.08 वाजता, गोरज मुहूर्तावर विजापूर रोड येथील शिवाजी अध्यापक विद्यालयाच्या प्रांगणात पार पडणार आहे. यंदाचे विवाह सोहळ्याचे 20 वे वर्ष असून, यावेळी 52 जोडपी विवाहबद्ध होणार आहेत. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील व नववधू-वरांच्या कुटुंबांना दिलासा मिळावा. या उद्देशाने विवाह सोहळ्याचे आयोजन लोकमंगलकडून करण्यात आले आहे. या सोहळ्याचा सर्व खर्च लोकमंगल फाऊंडेशनमार्फत करण्यात येणार आहे.
वधू-वरांना आयुष्यभर उपयोगी पडणाऱ्या गृहोपयोगी साहित्यांची भेटवस्तू म्हणून देण्यात येणार आहे. भोजनव्यवस्थेपासून ते नववधू-वरांचे कपडे व सर्व सुविधा फाऊंडेशनतर्फे पुरवल्या जाणार आहेत. याशिवाय वधू-वरांची शहरातील प्रमुख मार्गाने रथामधून मिरवणूकही काढण्यात येणार आहे. शिवाय प्रत्येकाच्या धर्माप्रमाणे विवाह लावून दिले जाणार आहेत.