

सोलापूर : सध्या केंद्र शासनाच्या माध्यमातून डिजिटल इंडिया संकल्पना प्रत्यक्षात अंमलात आणले जात असून, राज्यातील 930 गावांमध्ये भारतीय संचार निगम लिमिटेड यांच्यावतीने फोर-जी सेवेसाठी टॉवर उभारले जाणार आहे. त्यासाठी 200 चौरस मीटर जागा विनामूल्य उपलब्ध केली जाणार आहेत, त्याबाबतचा आदेश राज्य शासनाने काढला आहे.
भारतीय संचार निगम लिमिटेडचे मुख्य महाप्रबंधक यांनी त्यांच्या दि. 16 ऑगस्ट 2022 च्या पत्राद्वारे महाराष्ट्रातील दूरक्षेत्रातील 2386 गावांमध्ये गाऊंड बेसड टॉवर अँड हाल्टींग ऑफ इक्युपमेंटच्या प्रयोजनासाठी 200 चौ.मी. जागा ही विना मोबदला उपलब्ध मिळावी अशी मागणी केली होती.
त्यानंतर आता संबंधित जिल्हाधिकारी यांच्यामार्फत ही जागा उपलब्ध करुन दिली जाणार आहे. पायाभूत सुविधा तसेच, वीज पुरवठा व जोडणी, केबल टाकण्यासाठी रस्त्याचा वापर करण्याच्या कामांबाबत प्रशासकीय स्वरूपाच्या मान्यता प्रदान करण्याच्या दृष्टीने मागणी करण्यात आली होती. परंतु दि. 30 मे, 2025 च्या पत्रानुसार 930 गावांमध्ये प्रयोजनासाठी 200 चौ.मी. जागा विनामूल्य उपलब्ध करुन देण्याची मागणी करण्यात आली. त्यानुसार आता ही जागा उपलब्ध झाल्याने फोर जी सेवा सुरु होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
राज्यातील 930 पैकी सोलापूर जिल्ह्यातील 12 ठिकाणी फोर-जी टॉवर उभारले जाणार आहेत. यात इब्राहिमपूर (अक्कलकोट) येथे दोन, किरनळ्ळी (अक्कलकोट), तोरणी (अक्कलकोट), तुकपिंपरी (बार्शी) येथे दोन, मांजरेगांव (करमाळा), हतकरवाडी (माढा), नातेपूते (माळशिरस), जंगलगी (मंगळवेढा), आगाळगांववाडी (सांगोला) या ठिकाणी फोरजी टॉवर उभारले जाणार असून, त्यासाठी शासनाकडून 200 चौमी जागा उपलब्ध होणार आहे.
जिल्हानिहाय टॉवरसाठी संख्या
अमरावती - 61, गडचिरोली - 41, लातूर - 67, नांदेड - 70, नाशिक - 30, परभणी - 73, सोलापूर - 12.