

सोलापूर : बीएस्सी नर्सिंगच्या प्रवेशाची वाट पाहणार्या विद्यार्थ्यांसाठी दोन महत्त्वाच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. राज्यातील अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे अनेक विद्यार्थी नोंदणी करू शकले नाहीत, त्यामुळे राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने प्रवेशाची मुदत दि. 5 ऑक्टोबरपर्यंत वाढवली आहे.
यासोबतच, भारतीय नर्सिंग कॉन्सीलने विद्यार्थ्यांच्या हितासाठी एक मोठा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. प्रवेशासाठी असलेली 50 टक्के पर्सेंटाईल गुणांची अट रद्द करण्यात आली आहे. याचा अर्थ, ज्या विद्यार्थ्यांनी एमएच-नर्सिंग सीईटी परीक्षा दिली आहे, ते सर्व विद्यार्थी आता बीएस्सी नर्सिंग प्रवेशासाठी पात्र आहेत. आतापर्यंत 50 टक्के गुण मिळाले नाहीत म्हणून जे विद्यार्थी नोंदणी करू शकले नव्हते, त्यांनाही ही नोंदणी करण्याची संधी मिळाली आहे. ज्या विद्यार्थ्यांची नोंदणी प्रक्रिया अपूर्ण राहिली आहे, त्यांना ती पूर्ण करण्याची संधी मिळाली आहे. चालू शैक्षणिक वर्षासाठी एक सुधारित संधी असून, या निर्णयामुळे अनेक विद्यार्थ्यांचा फायदा होणार आहे.
विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित संकेतस्थळाला भेट देऊन आपला प्रवेश निश्चित करावा, असे सीईटी कक्षामार्फत आवाहन करण्यात आले आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना करिअरची नवी संधी मिळणार आहे.