

करमाळा: उजनी धरणावरील ब्रिटिश कालीन १७० वर्षापूर्वीच्या डिसकळ पुलावर करमाळ्याच्या बाजूने पुन्हा नवीन भगदाड पडले असून आता हा पूल कधी कोसळेल हे सांगता येत नसल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. या पुलावरील प्रवास असुरक्षित बनला आहे.अजूनही या पुलावरील जीवघेणी वाहतूक सुरू असल्याने हा मार्ग चार चाकी वजनी वाहनासाठी न रोखल्यास दुर्घटना अटळ ठरणार आहे.
या पुलाचा काही भाग आज सकाळी ११ वाजता कोसळला आहे. येथून जाणारे टाकळी येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन गुळवे, अनुराग गुळवे, आकाश गुळवे आदि नागरिक या पुलावरून जात होते. अचानक हा पूल करमाळ्याच्या बाजूने कोसळण्याच्या अवस्थेत आला. बघता बघता पुलाच्या कमानीजवळ डाव्या बाजूने पुलाचा काही भाग उजनीच्या पाण्यात कोसळला. यावेळी घाबरून जाऊन येथील लोकांनी काही वेळ रस्ता बंद केला. दगड व काटेरी झाडे लावून एक बाजू वाहतुकीसाठी बंद केली.
उजनी धरण ९५ टक्के भरल्याने पाणी पूलाला टेकले आहे. पाण्याच्या दाबाने व येणाऱ्या लाटा मुळे आधीच कमजोर झालेल्या ह्या पूलाची शाश्वती देता येत नाही. खडी व बांधकामासाठी लागणारी डस्ट च्या वजनी वाहनाची वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू होती. आताही भिगवण ते करमाळा मार्गावर हजारो वाहनाचा धोकादायक प्रवास सुरू आहे. ब्रिटिश कालीन पूल आता अखेरची घटका मोजतोय अशा दैनिक पुढारीच्या माध्यमातून यापूर्वीच परिस्थिती चव्हाट्यावर आणली तरीही सार्वजनिक बांधकाम विभाग बेफिकीरपणे वागत आहे.
उजनी धरणाच्या बॅकवॉटरवरील ब्रिटिश कालीन डिसकळ पूल ब्रिटिश सरकारने या पूलाची मुदत संपल्याचे पत्राने कळवूनही दोन दशक उलटले तरीही आपल्या प्रशासनाला याचे गांभीर्य नाही असे दिसत आहे. अनेक वर्षापासून या पुलावरून शेकडो वाहनाने हजारो लोक दररोज नियमितपणे जीव मुठीत घेऊन प्रवास करतात. या पूलावर अनेक वेळा मोठमोठाली भगदाड पडले आहेत. या पूलाला १४ जानेवारी २३ मध्ये मोठे भगदाड पडले होते. यावेळी पुणे, सोलापूर आधी ठिकाणाहून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी येऊन या पूलाची पाहणी करून सक्तीने जड वाहतूक बंद केली होती. त्यानंतर थोडीफार या पुलाची दुरुस्ती करून त्या भगदाडाच्या शेजारून दगडाचे कुंपण करण्यात आले होते मात्र आता ते कुंपण दिसतच नाही. यानंतरही या पुलाची अनेक ठिकाणी पडझड झाली व पडझड सुरूच आहे. पूलाच्या कमानी जवळ तसेच पिलर वर तसेच आतील बाजूने या पूलाचे चिरे कोसळत आहेत. याची दुरुस्ती करणे गरजेचे होते मात्र याकडे सार्वजनिक बांधकाम खाते दुर्लक्ष करत आहे. मराठवाड्यापासून बार्शी, परंडा, जेऊर ,करमाळा, कोर्टी, जिंती, टाकळी, डिकसळ, भिगवन, पुणे असा प्रवास करणारी दररोज शेकडो वाहने या ठिकाणावरून जात आहेत.
सध्या पुलाला खिंडार पडलेने पुल कधी ढासळून जाईल व कधी वाहने या उजनीच्या जलाशयात जलसमाधी घेतील याची शाश्वती सध्या तरी देता येत नाही.त्यामुळे वाहनचालकांना आणि नागरिकांना सध्या धोकादायक परिस्थितीतून जीवघेणा प्रवास टाळणे गरजेचे आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी या पुलावरून प्रवास करणे अधिक धोकादायक झाले आहे. .पुणे जिल्ह्यातील इंदापूर आणि सोलापूर जिल्ह्यातील करमाळा या दोन तालुक्यांना कमी अंतराने जोडणारा हा सध्या महत्त्वाचा पूल आहे .याच्या दुरवस्थेकडे संबंधित प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. जेणेकरून संभाव्य अपघात टाळता येतील आणि नागरिकांचा प्रवास सुरक्षित होईल.
ब्रिटिशकालीन डिकसळ पुलाला सकाळी ११ वाजता एका बाजूने खिंडार पडले आहे. रस्त्यावर मोठे गर्डल टाकले असले तरी खडी व डस्ट घेऊन जाणारे मोठे वजनी हायवा- ट्रक मुळेच हे खिंडार पडलेले आहे. प्रशासनाने याला रोखणे आवश्यक होते मात्र तसे घडले नाही. त्यामुळे या भागातील ४० गावांना हा पूल ढासळला तर दवाखाने व महत्त्वाच्या कामाला जाण्यासाठी ५० किलोमीटरचा वळसा घालावा लागणार आहे.
सचिन गुळवे, सामाजिक कार्यकर्ते, टाकळी.
महसूल प्रशासनाने घटनास्थळी धाव घेऊन डिक्सळ पूल दोन्ही बाजूने वाहतुकीसाठी चरी खोदून बंद केला आहे. तसेच इंदापूर तहसीलदार व दोन्ही जिल्हा प्रशासनाला ही याची माहिती दिलेली आहे सध्या १०० टक्के वाहतूक बंद आहे. नागरिकांनीही पर्यायी रस्त्याचा वापर करावा व आपला जीव धोक्यात घालू नये.
शिल्पा ठोकडे, तहसीलदार, करमाळा