

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा
सीमा प्रश्न 68 वर्षे का प्रलंबित आहे? सध्या सुप्रीम कोर्टात सीमा खटला सुरू आहे. सीमाप्रश्नी महाराष्ट्र राज्याच्या बाजूने निर्णय होईल, यात शंका नाही; मात्र या खटल्याला इतका विलंब का होतो आहे? सीमा प्रश्न त्वरित फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा आणि यासाठी महाराष्ट्रातील सर्वच नेत्यांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन कोल्हापूरचे खासदार छत्रपती शाहू महाराज यांनी केले.
बुधवारी बेळगावातील ज्योती महाविद्यालयात गडहिंग्लज येथील महात्मा गांधी विचार मंचच्या वतीने पहिला महात्मा गांधी विचार गौरव पुरस्कार ज्येष्ठ नेते कॉ. कृष्णा मेणसे यांना खासदार छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी खा. शाहू महाराज बोलत होते. ते म्हणाले, महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्न त्वरित सुटावा, यासाठी मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांसह अन्य लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा करेन. तसेच संसदेमध्येही याप्रश्नी आवाज उठवेन.
खा. शाहू महाराज म्हणाले, बेळगाव ते सावंतवाडी रेल्वेसाठी मी प्रयत्न करत आहे. याबाबत रेल्वेमंत्र्यांना पत्र पाठवले असून प्रत्यक्ष भेटून पाठपुरावा करणार आहे.