

सोलापूर : रक्तदान हे जीवनदान... पण याच जीवनदानाला काळिमा फासणार्या एका महाभयंकर रॅकेटचा दैनिक ‘पुढारी’ने केलेल्या धाडसी स्टिंग ऑपरेशनमध्ये पर्दाफाश केला आहे. सोलापुरात रक्ताच्या आणि प्लाझ्माच्या होणार्या तस्करीचे धक्कादायक वास्तव समोर येताच, सुस्त प्रशासन खडबडून जागे झाले आहे. या वृत्ताची तत्काळ आणि गंभीर दखल घेत प्रभारी जिल्हाधिकारी कुलदीप जंगम यांनी तातडीने उच्चस्तरीय बैठक बोलावून शहर आणि जिल्ह्यातील सर्व 19 रक्तपेढ्यांची झाडाझडती घेण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयामुळे रक्तदानाच्या पवित्र नावाखाली कोट्यवधी रुपयांची माया जमवणार्या रक्त तस्करांचे धाबे दणाणले आहेत.
सोलापूर परिसरातील काही रक्तपेढ्या रक्त आणि प्लाझ्माची तस्करी करण्यास हातभार लावत आहेत. यातून करोडो रुपयांचा नफा तस्कर आणि संबंधित रक्तपेढ्यांना होत आहे. रक्तदान शिबिरावेळी दात्यांना पाचशे रुपयांपासून एक हजार रुपयांपर्यंतचे गिफ्ट देण्याचा नवा फंडा तस्करांशी संबंधित रक्तपेढ्यांनी गेल्या काही वर्षांपासून सुरू केला आहे. या कृष्णकृत्याची पोलखोल दै. ‘पुढारी’ने स्टिंग ऑपरेशनच्या माध्यमातून केली. त्यामुळे जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले.
प्रभारी जिल्हाधिकारी कुलदीप जंगम यांनी आरोग्य विभागाची बैठक घेतली. रक्तपेढ्यांतील गैरप्रकाराबाबत यावेळी सविस्तर चर्चा झाली. त्यानंतर एकूणच या प्रकाराची गांभीर्याने दखल घेत प्रभारी जिल्हाधिकारी जंगम यांनी सोलापूर शहर जिल्ह्यातील रक्तपेढ्यांची तपासणी करण्यासाठी पथक नेमण्याचा आदेश दिला. रक्तपेढ्यांची सखोल चौकशी करून त्याचे ऑडिटही तपासणी यानिमित्ताने करण्याचे आदेश आहेत. याबाबत अन्न व औषध प्रशासन, जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, एड्स नियंत्रण विभाग यांना लेखी पत्र देण्यात आले आहे.
दै. ‘पुढारी’चे एक्लुझिव्ह स्टिंग ऑपरेशन
सोलापुरात नियम डावलून रक्तदात्याचे 60 मिली अतिरिक्त रक्त काढून घेतले जात असल्याचा धक्कादायक प्रकार दै. ‘पुढारी’ने स्टिंग ऑपरेशनद्वारे उघडकीस केला होता. विशेष म्हणजे रक्तातील प्लाझ्मा विक्रीसाठी वापरला जात असून, विविध उपक्रमांतून जमवलेले रक्त जादा दराने परस्पर विकले जात असल्याचे या स्टिंगमधून समोर आले.