

पंढरपूर : भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांच्या पंढरपूर दौऱ्यावेळी विठ्ठल मंदिराच्या बाहेर व्हीआयपी दर्शनावरुन मोठा गोंधळ झाला. महाडिक यांच्यासोबत असलेल्या शेकडो भाजप कार्यकर्त्यांनी विठ्ठलाचे व्हीआयपी दर्शन मिळावे, यासाठी मंदिराच्या व्हीआयपी गेटवर धक्काबुक्की, ढकलाढकली करत गोंधळ घातला. यामुळे देशभरातून आलेल्या भाविकांमधून नाराजी व्यक्त करण्यात आली.
सध्या सुरू असलेल्या मे महिन्याच्या सुट्ट्या आणि अधिक मासामुळे देशभरातून रोज हजारोंच्या संख्येने भाविक पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात येत असून दर्शनासाठी उन्हात दिवसभर लांबच लांब रांगा लागल्या आहेत. असे असताना भाजप कार्यकर्त्यांनी मंदिरासमोर व्हीआयपी दर्शनासाठी गोंधळ घातल्याचा प्रकार घडल्यामुळे काही काळ गोंधळ झाला.
सोमवार, दि. 18 रोजी सायंकाळी भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक हे पंढरपुरात आले होते. त्यांच्यासोबत शेकडो कार्यकर्तेही होते. त्यावेळी कृष्णराज महाडिक आणि त्यांच्या सोबत मोजक्या पाच लोकांना विठ्ठल मंदिरात व्हीआयपी गेटवरून प्रवेश देण्यात आला. मात्र कृष्णराज महाडिक यांच्यासोबत दर्शन घेण्यासाठी शेकडो भाजप कार्यकर्त्यांनी मात्र व्हीआयपी गेटवर मोठी गर्दी केली. गोंधळ घालत मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिस, सुरक्षारक्षक व कार्यकर्ते यांच्यामध्ये गोंधळ उडाल्याचे चित्र दिसून आले.
दरम्यान, श्री विठ्ठल- रुक्मिणीच्या दर्शनासाठी आलेल्या सर्वसामान्य भाविकांना लांबच लांब दर्शन रांगेत तासन्तास ताटकळत उभे राहावे लागत आहे. मात्र, दुसरीकडे राजकीय मंडळींना मिळणाऱ्या थेट दर्शन सुविधेमुळे भाविकांनी मंदिर समितीच्या कार्यपध्दतीवर संताप व्यक्त केला आहे.