

पंढरपूर : पंढरपूर पंचायत समितीचे सभापतीपदाचे आरक्षण अनुसूचित जाती सर्वसाधारणसाठी निघाले आहे. त्यामुळे आता पंचायत समिती निवडणुकीमध्ये चुरस जाणवणार असली, तरी अनेक इच्छूकांचा भ्रमनिराश झाला आहे. आता गणांचे काय आरक्षण पडते याकडे इच्छुकांचे लक्ष लागले आहे. पंढरपूर पंचायत समितीवर भाजपचे माजी आमदार प्रशांत परिचारक प्रणित पांडुरंग परिवाराची सत्ता आहे.
मात्र, सध्या राजकीय वातावरण बदलले असून राष्ट्रवादीचे आ. अभिजित पाटील, आ. राजू खरे हे पांडुरंग परिवाराला तसेच आ. समाधान आवताडे यांना टक्कर देण्याची तयारी करू लागले आहेत. त्यामुळे पंढरपूर पंचायत समितीवर झेंडा भाजपचा फडकणार की राष्ट्रवादीचा, हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे.
पंढरपूर पंचायत समितीमध्ये पंचायत समितीचे 20 गण आहेत. त्यामधून पंचायत समितीचे सदस्य निवडले जाणार आहेत. पंचायत समिती गणाचे आरक्षण जाहीर झाले की इच्छूक निवडणुकीच्या कामाला लागणार आहेत. पंचायत समिती गणात इच्छुकांनी मोर्चे बांधणी चालू केली आहे. परंतु, आता पंचायत समितीचे सभापती पद हे अनुसूचित जाती सर्वसाधारण निघाल्याने आता प्रत्येक गणात सर्व पक्षांमध्ये इच्छुकांची संख्या वाढणार आहे.
पंढरपूर पंचायत समितीवर आजपर्यंत काही अपवाद वगळता पांडुरंग परिवार प्रणित प्रशांत परिचारक गटाची सत्ता अबाधित राहिली आहे. परिचारक गटाकडून अनेकांना याआधी सभापती पदाची संधी मिळाली आहे. परिचारक विरोधात भालके अशी लढत झालेली आहे. मात्र, सध्या विधानसभा निवडणुकीनंतर राजकीय चित्र बदलले आहे. आता परिचारक विरोधात भालके लढत होणारच आहे. यात भर म्हणून आ. अभिजित पाटील, आ. राजू खरे यांचेही उमेदवार लढत देणार आहेत. त्यामुळे परिचारक गटासाठी ही निवडणूक सोपी राहिलेली नाही. खा. प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली भगीरथ भालके यांनी सपत्नीक दौरे वाढवले आहेत. तर खा. धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आ. अभिजित पाटील, आ. राजू खरे यांनीही उमेदवारांची चाचपणी सुरु केली आहे. तर माजी आमदार प्रशांत परिचारक, आ. समाधान आवताडे हे एकत्रित लढले तर चित्र समाधानकारक असणार आहे.