

सोलापूर : सध्या सोलापूर शहर व जिल्ह्यामध्ये आयारामांचा भारतीय जनता पक्षामध्ये भरणा सुरू आहे. त्यास निष्ठावंत कार्यकर्त्यांचा तीव्र विरोध आहे. या आरायाम संस्कृतीस कडकडून विरोध करत बाळे येथील भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी शहराध्यक्षांना जाब विचारात निवेेदन दिले.
दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारातून आ. सुभाष देशमुख व भाजपच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या दिलीप माने यांच्या भाजप प्रवेशाला विरोध दर्शविला. आंदोलनही केले होते. त्यापाठोपाठ आता सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्तेही पक्षातील आयाराम संस्कृतीविरोधात मैदानात उतरले आहेत.
पंधरा दिवसांपूर्वी सोलापूर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेतील नेत्यांना मुंबईत भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला. भाजपच्या शहराध्यक्ष आणि पदाधिकार्यांनी आम्हा कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता हा पक्ष प्रवेश घडवून आणल्याचा आरोप यावेळी कार्यकर्त्यांनी केला.
पक्षवाढीसाठी आम्ही आंदोलने केली, आमच्यावर गुन्हे दाखल झाले, राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या स्वयंसेवकांना मारहाण केली. अशा गुंडगिरी प्रवृत्तीच्या विरोध पाक्षातील नेते, कार्यकर्त्यांना भाजपात प्रवेश दिल्याबद्दल भाजपच्या निष्ठावंतांनी तीव्र संताप व्यक्त केला.
सोमवारी सकाळी प्रभाग क्रमांक 5 बाळे येथील कार्यकर्त्यांनी सिव्हील चौकातील भाजपा कार्यालयात शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांची भेट घेतली. यावेळी शहराध्यक्षा तडवळकर आणि कार्यकर्त्यांमध्ये काही काळ वाद-विवाद झाला.
यावेळी राजाभाऊ अलुरे, विनय ढेपे, आनंद भवर, शिरीष सुरवसे, रतन क्षीरसागर, माजी नगरसेविका ज्योती बमगोंडे, स्वाती आवळे, समाधान आवळे, विजय बमगुंडे, सुहास माने, सुनिता कोरे, सीमा शिंदे आदी उपस्थित होते.
तडीपार, गुंडप्रवृत्तीच्या लोकांना भाजपात प्रवेश दिल्याच्या कारणावरुन बाळे येथील भाजपा कार्यकर्त्यांनी शहर भाजपात कार्यालयात शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांना जाब विचारात असताना गोधंळ उडाला. यावेळी पक्षाचे निष्ठावंत ज्येष्ठ कार्यकर्ते राम तडवळकर यांनी मध्यस्थी करत तोडगा काढण्याचा प्रयत्न केला.
आम्ही प्रभाग क्रमांक पाचमध्ये भाजपा वाढविला. राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या स्वयंसेवकांना ज्यांनी मारहाण केली, त्यांनाच भाजपात प्रवेश देण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी अपशब्द वापरणार्यांना भाजपात प्रवेश देणे हे चुकीचे आहे. यामुळे कार्यकर्ते खचले आहेत. याबाबतचे निवेदन शहराध्यक्षांना देण्यात आले आहे.
राजाभाऊ आलुरे, बाळे