

सोलापूर : महापौर व उपमहापौरपदाची निवडणूक बिनविरोध पार पडत सोलापूर महानगरपालिकेत सत्तास्थापनेचा पहिला टप्पा भाजपने पूर्ण केला आहे. महापौरपदी विनायक कोंड्याल तर उपमहापौरपदी देवकर विराजमान झाले. भाजपाने आपली सत्ता अधिकृतपणे मजबूत केली. मात्र आता महापालिकेच्या स्थायी समिती, विविध विषय समित्या आणि स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याच टप्प्यावर भाजपसमोर सर्वात मोठे आव्हान उभे ठाकले आहे.
महापौर विनायक कोंड्याल यांनी सर्व निवड प्रक्रिया 20 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत घेण्याचे जाहीर केले आहे. या पुढील पदांसाठी इच्छुकांची अक्षरशः गर्दी झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, स्वीकृत नगरसेवक पदासाठीच तब्बल 200 ते 300 इच्छुकांनी थेट किंवा अप्रत्यक्षपणे आपली इच्छा पक्षश्रेष्ठींकडे व्यक्त केली आहे. यामध्ये केवळ पक्षातील कार्यकर्तेच नव्हे, तर विविध समाज बांधवांचे प्रतिनिधी, संघटनांचे पदाधिकारी आणि दबावगटही सक्रिय झाले आहेत. परिणामी, केवळ नऊ स्वीकृत नगरसेवकांच्या जागांसाठी प्रचंड स्पर्धा निर्माण झाली आहे.
या निवडी करताना पक्षश्रेष्ठींना मोठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे. एकीकडे निष्ठावंत, वर्षानुवर्षे पक्षासाठी काम करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांना संधी देण्याची अपेक्षा आहे. तर दुसरीकडे निवडणुकीपूर्वी किंवा निकालानंतर भाजपमध्ये दाखल झालेल्या आयाराम-गयाराम नेत्यांचेही दबाव तंत्र सुरू आहे. महापौरपद ज्या पद्धतीने इतर पक्षातून आलेल्या नेत्याला देण्यात आले, त्याच धर्तीवर पुन्हा एकदा रेड कार्पेट अंथरून संधी दिली जाणार का? की खऱ्या अर्थाने पक्षनिष्ठेला प्राधान्य दिले जाणार, हा प्रश्न कार्यकर्त्यांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.
स्वीकृत नगरसेवक प्रभाव टाकणारी पदे
स्थायी समिती सभापतीपद, विविध विषय समित्यांची अध्यक्षपदे आणि स्वीकृत नगरसेवक ही पदे केवळ मानाचीच नाहीत, तर महापालिकेतील आर्थिक व प्रशासकीय निर्णयांवर प्रभाव टाकणारी आहेत. त्यामुळे या पदांवर कोणाची वर्णी लागते, यावर आगामी काळातील महापालिकेचे राजकारण आणि सत्तासंतुलन ठरणार आहे. इच्छुक उदंड असल्याने पक्षश्रेष्ठी कोणाला समाधानी ठेवतात आणि कोण नाराज होतो. यावर भाजपमधील पुढील राजकीय हालचाली ठरणार आहेत.
पराभूत उमेदवारांना संधी नाही
स्वीकृत पदासाठी पराभूत उमेदवारांना संधी नाही असे पक्षाच्यावतीने जाहीर केले असले तरी या काही जण अपवाद असल्याची चर्चा आहे. तर शहराध्यक्ष रोहणी तडवळकर, प्रभाकर जामगुडे, नाना काळे, श्रीकांत घाडगे, सुधा आळळीमोरे, कुमुंद अंकाराम, स्वीकृत साठी तर स्थायी समिती सभापतीसाठी प्रा.नारायण बनासोडे, राजश्री कणके, अनंत जाधव यांची संभाव्य नावे आहेत. त्याशिवात इतर सहा विषय समिती सभापतिपदासाठी अनेक इच्छुक आहेत.