

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील 11 नगरपालिका आणि 1 नगरपंचायतीसाठी निवडणूक कार्यक्रम सुरू असून, 152 प्रभागांतील 289 नगरसेवकपदासाठी ही निवडणूक होत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा कालावधी अंतिम टप्प्यात आला असतानाही महाविकास आघाडी आणि महायुतीतील कुठल्याही राजकीय पक्ष आणि उमेदवारी जाहीर केलेली नाही. मोहोळ नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी शीतल सुशील क्षीरसागर यांची तर अनगर नगरपंचायतच्या नगराध्यक्षपदासाठी प्राजक्ता अजिंक्यराणा पाटील यांना भारतीय जनता पक्षाची अधिकृत उमेदवारी रविवारी जाहीर केली, तर अक्कलकोट, दुधनी, मैंदर्गी, अकलूज या नगरपालिकेसाठी उमेदवारी कोणाच्या गळ्यात पडणार याची उत्सुकता लागली आहे.
रविवारी सुट्टी असूनही निवडणूक आयोगाने गैरसोय टाळण्यासाठी उमेदवारी अर्ज स्वीकारण्यासाठी कार्यालय सुरु ठेवले होते. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आज (सोमवारी) दुपारी 3 वाजेपर्यंत शेवटची तारिख असल्याने इच्छुकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटचा दिवस आला तरी भाजपा, शिवसेना शिंदे गट, शिवसेना उबाठा, राष्ट्रवादी अजित पवार गट, राष्ट्रवादी शरद पवार गट व अन्य पक्षांनी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीची आपले पत्ते अजूनही उघडले नाहीत. त्यामुळे इच्छुकांची धाकधुक वाढली आहे. बंडखोरी टाळण्यासाठी राजकीय पक्षांनी उमेदवारीच्या नावाचा गुपित कायम ठेवला आहे.
जिल्ह्यातील बार्शी, अकलूज, मोहोळ, पंढरपूर, अक्कलकोट, कुर्डूवाडी, करमाळा, सांगोला, मंगळवेढा, मैंदर्गी व दुधनी या नगर परिषद तर अनगर नगरपंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम सुरु असून 152 प्रभागातून 289 सदस्य निवडले जाणार तर यासाठी 499 मतदान केंद्रावर ही मतदान होणार आहे. 19 नोव्हेंबर उमेदवारी माघारी घेता येणार असून, 2 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. तर 3 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.