

तुळजापूर : पुढारी वृत्तसेवा
गेल्या आठवड्यात पार पडलेल्या श्री तुळजाभवानी मातेच्या अश्विनी यात्रेनंतरच्या पहिल्या मंगळवारी लाखो भाविकांनी तुळजापुरात देवी दर्शनासाठी गर्दी केली. मंदिर संस्थानने संभाव्य गर्दी लक्षात घेऊन भाविकांना आजपर्यंत घाटशीळ रोड भवानी कुंडमार्गे दर्शन मंडपात सोडण्याचे नियोजन केले होते.
मात्र लाखोंच्या संख्येने झालेली गर्दी मंदिरात जाण्यासाठी थेट राजे शहाजी महाद्वारात येऊन धडकत होती. या गर्दीला आवरायला कुठलाही सुरक्षारक्षक किंवा पोलिस यंत्रणा कार्यरत नव्हती. मंदिरातील गर्दी मातंगी मंदिराकडून बाहेर काढली जात होती.
येथून बाहेर पडताना आबालवृद्ध, महिलांची दमछाक होत होती. महाद्वारात पौर्णिमा कालावधी संपला की, श्रीफळ फोडण्यास प्रारंभ झाला आहे. त्याच्या पाण्याची दुर्गंधी, अनवाणी पायांना टोचणारी नारळाची कवचले भाविकांना आणखी त्रासदायक ठरत होते.
मातेच्या नवरात्रौत्सवात वारी चुकलेल्या भाविकांकडून देवीला पंचामृत अभिषेकासह सर्व कुलधर्म, कुलाचार करून मातेचरणी नतमस्तक होत आहेत. एक आठवड्यानंतर पुन्हा एकदा तुळजापूरची बाजारपेठ भाविकांच्या गर्दीन बहरून गेली होती. मंगळवारी सायंकाळी 'आई राजा उदो उदो'च्या जयघोषात मंदिर परिसरात आई तुळजाभवानी मातेची छबिना मिरवणूक काढण्यात आली.
अश्विनी यात्रेनंतर आलेला रविवार व मंगळवार भाविकांच्या गर्दीन खचाखच भरणार याची जिल्हा प्रशासनाला कल्पना असताना पोलिस बंदोबस्त काढण्यात आल्याने लाखो भाविकांना गैरसोयींना सामोरे जावे लागले.
परतीचा पाऊस दररोज कोसळत आहे, शिवाय यात्रेत झालेली घाण अद्याप जैसे थे असल्याने सर्वदूर घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्याचाही स्थानिकांसह बाहेरून येणाऱ्या भक्तांना त्रास होत आहे. पालिका प्रशासनाने शहरात युद्धपातळीवर साफसफाईची मोहीम राबविण्याची गरज व्यक्त होत आहे.