

सोलापूर : आषाढी एकादशी सोहळ्यासाठी मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाने यंदा २४ ते २६ जुलै या तीन दिवसांत नियमित व विशेष अशा १०० रेल्वेगाड्या चालवल्या. १ लाख १३ हजारांहून अधिक भाविकांनी प्रवास केला. त्यामुळे रेल्वेच्या तिजोरीत १ कोटी २७ लाख रूपयांची भर पडली.
रेल्वेकडून वारकऱ्यांच्या सोयीसाठी अतिरिक्त काही तिकीट विक्रीच्या खिडक्या, एटीव्हीएम, मोबाईल तिकीट यंत्रणा व रेलवन ॲपचा वापर वाढविले. स्थानकावर प्रशस्त निवारा शेड, स्वच्छतागृहे, स्वच्छ व शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा, प्रभावी बॅरेकेडींग, बहुभाषिक उद्घोषणा, व्हिडिओ वॉल, सीसीटीव्ही नियंत्रण कक्ष याशिवाय २४ तास वैद्यकीय सेवा पथकाची नियुक्ती करून त्याद्वारे वारकऱ्यांना वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिली. रेल्वेच्या वैद्यकीय पथकाकडून १ हजार २१९ वारकऱ्यांवर उपचार केले.
वारकऱ्यांची वारी अधिक हाताळण्यासाठी अतिरिक्त व कायमस्वरूपी होल्डिंग एरिया व आच्छादित प्रतीक्षास्थळ उभारण्यात आले होते. वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक जयदीप प्रदक्षिणे, विभागीय सुरक्षा आयुक्त ए. के. सिंह तसेच विविध विभागातील अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली रेल्वे कर्मचाऱ्यांनी वारकऱ्यांसाठी सेवा बजावली. 'वारकरी सेवा हीच विठ्ठल सेवा' हा भाव रेल्वेने जपला.