

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील सिंचन व्यवस्था मजबूत करण्यासाठी भीमा नदीवर १५ बॅरेजेस बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या बॅरेजेसमुळे नदीकाठच्या गावांना पाण्याचा मोठा फायदा होईल. शेतीसाठीही सिंचन सुविधा उपलब्ध होणार आहेत. उजनी धरण परिसराचा पर्यटन, उद्योग आणि ऊर्जा क्षेत्रात एकात्मिक विकास करून सोलापूर जिल्ह्याला नवी ओळख मिळवून देण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सांगितले.
सोलापुरातील जलसंपदा विभागाच्या मुख्य अभियंता कार्यालयाचे उदघाटन सिंचन भवन येथे शुक्रवारी जलसंपदा मंत्री विखे-पाटील यांच्या हस्ते झाले. त्यानंतर जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आ. सुभाष देशमुख, आ. सचिन कल्याणशेट्टी, आ. अभिजित पाटील, आ. उत्तमराव जानकर, आ. देवेंद्र कोठे, महापौर विनायक कोंड्याल यांच्यासह जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
पर्यटन आराखडा मंजूर
होटगी आणि एकरुख परिसराच्या पर्यटन विकास आराखड्यालाही मंजुरी देण्यात आली आहे. या भागात पर्यटकांसाठी आवश्यक सुविधा निर्माण करून पर्यटनाला चालना दिली जाणार आहे. उजनी परिसरात सुमारे १ लाख ६० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे. तसेच उजनी धरण परिसरात दोन हजार मेगावॅट वीजनिर्मिती प्रकल्प कार्यान्वित होणार आहे.
उजनीतील गाळ काढणार
उजनी धरणातील गाळ काढल्यानंतर पाणी साठवणूक क्षमता वाढणार आहे. धरणातील सुमारे २० टीएमसी गाळ काढण्याचे काम हाती घेतले आहे, असे विखे-पाटील यांनी सांगितले.