

पंढरपूर : श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन भगीरथ भालके यांनी रोजगार हमीमंत्री भरत गोगावले यांची बुधवारी (दि. 11) पंढरपूर येथे भेट घेत शिवसेना शिंदे गटात प्रवेश करण्याचे संकेत दिले. भालके एकटे गेले नाहीत तर शिष्टमंळाला घेऊन गेल्याने काँग्रेसला मोठा धक्का मानला जात आहे. त्यामुळे आगामी काळात पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात वेगळे राजकीय चित्र दिसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
राज्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटात येण्यासाठी नेत्यांची संख्या वाढू लागली आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते भगीरथ भालके यांनी बुधवारी गोगावले यांची भेट घेऊन त्यांच्याबरोबर चर्चा केली. यावेळी त्यांच्याबरोबर भालके गटातील नेते उपस्थित होते. भालके यांचे शिवसेनेशी जवळीक माजी केंद्रीय मंत्री सुशिलकुमार शिंदे व खा. प्रणिती शिंदे यांना मोठा धक्का मानला जात आहे. कारण पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून लोकसभेला खा. प्रणिती शिंदे यांना मोठे मताधिक्य मिळवून देण्याचे काम भालके यांनी केले होते. त्यामुळेच खा. शिंदे यांच्या आग्रहाखातर भालके यांना विधानसभेची उमेदवारी काँग्रेसकडून मिळाली होती. परंतू भालके पराभूत झाल्याने ते नाराज झाले होते.
सार्वजनिक कार्यक्रमातून भांलके नॉटरिचेबल झाले होते.आठवडाभरापूर्वी जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते व माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. यामुळे शिवसेना शिंदे गटात येण्यासाठी नेत्यांचे इनकमिंग सुरू झाले आहे. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूका डोळ्यासमोर ठेवून काँग्रेसचे नेते भालके यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर गायब झालेले भालके हे सात महिन्यानंतर प्रगट झाले आहेत. त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असल्याची चर्चा तालुक्यात सुरु आहे. जर एकनाथ शिंदे यांनी भगीरथ भालके यांना शिवसेना पक्षात प्रवेश दिला तर पंढरपूर तालुक्यातील राजकारणात मोठे फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.