

सोलापूर : सकाळचा नाश्ता हा दिवसभर उत्साही राहण्यासाठीचा सोलापूरकरांसाठी आधार ठरत आहे. साधारणपणे प्रत्येक घरांमध्ये नाश्त्यासाठी पोहे आणि पराठा हे दोन पदार्थ प्रामुख्याने बनवले जातात. दोन्ही चविष्ट, बनवायला सोपे आणि आवडीनुसार बदल करता येणारे आहेत. पण आरोग्याच्या दृष्टीने विचार केल्यास या दोघांमध्ये सर्वात उत्तम पर्याय कोणता आहे? याबद्दल येथील आहार तज्ज्ञ अमृता बोल्ली यांनी माहिती दिली आहे.
अमृता बोल्ली यांनी याबाबत सांगितले, पराठा सहसा संपूर्ण गव्हाच्या पिठापासून बनवलेला असतो, ज्यामुळे त्याचे अनेक आरोग्य फायदे आहेत. गव्हाच्या पिठातील कार्बोहायड्रेट्स शरीराला हळूहळू ऊर्जा पुरवतात. यामुळे तुम्हाला ऊर्जा मिळते, भूक लागत नाही आणि तुम्ही अधिक काळ सक्रिय राहता.
संपूर्ण गव्हाच्या पराठ्यांमध्ये आहारातील फायबर असते, जे पचनक्रिया निरोगी ठेवते आणि रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत करते. पांढरा ब्रेड किंवा पुरीसारख्या पदार्थांपेक्षा हा अधिक संतुलित पर्याय आहे. पनीर, डाळ किंवा पालक यांसारख्या घटकांनी भरलेला पराठा प्रथिनांचा एक उत्तम स्रोत बनतो. प्रथिनांमुळे स्नायूंची दुरुस्ती होते आणि पोट भरलेले राहते. ज्यामुळे वजन नियंत्रित ठेवणे सोपे जाते.
तर दुसरीकडे चपटे केलेले तांदूळ म्हणजे पोहे, जो हलका आणि झटपट होणारा नाश्ता आहे. पोहे लवकर शिजतात आणि पोटासाठी हलके असतात. त्यामुळे गरमीच्या किंवा दमट हवामानासाठी हा एक उत्तम नाश्ता आहे. पोह्यांमध्ये नैसर्गिकरित्या चरबीचे प्रमाण कमी असते. त्यामुळे कॅलरी नियंत्रित ठेवणाऱ्या लोकांसाठी हा उत्तम आहे. यामुळे तुम्हाला आळस न येता दिवस सुरू करण्यासाठी पुरेशी ऊर्जा मिळते.
पोहे लोहाचा एक चांगला स्रोत आहेत. विशेषतः जेव्हा ते लोखंडी कढईत बनवले जातात. पोह्यांमधील कार्बोहायड्रेट्स रक्तातील साखरेच्या पातळीत अचानक वाढ किंवा घट न करता स्थिर ऊर्जा देतात यामुळे नाश्ता टाळू नका असा सल्लाही अमृता बोल्ली यांनी दिला.