

फर्दापूर : जगप्रसिद्ध अजिंठा लेणी परिसरात शनिवारी (दि. 7) मधमाश्यांनी दोन वेळा हल्ला चढविल्याने खळबळ उडाली आहे. या हल्ल्यांमध्ये जवळपास दोनशे पर्यटक जखमी झाले आहे. पुरातत्त्व प्रशासनाच्या तयारीवर प्रश्नचिन्ह निर्माण करत पर्यटकांनी संताप व्यक्त केला.
प्राप्त माहितीनुसार, पहिला हल्ला लेणी क्रमांक 10 जवळ दुपारी 3.30 च्या सुमारास झाला. अचानक मधमाश्यांनी पर्यटकांवर हल्ला केला. या घबराटीमुळे अनेक पर्यटकांनी लेणी परिसरातून पळ काढून सप्तकुंड धबधबा परिसराकडे धाव घेतली. मात्र, तिथेही दुर्दैव टळले नाही. दुपारी साडेचारच्या सुमारास सप्तकुंड धबधबा परिसरात तेथे असलेल्या मोहळातील मधमाश्यांनी पर्यटकांवर हल्ला चढविला. या हल्ल्यातही काही पर्यटक जखमी झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
शनिवारी वीकेंडसह बकरी ईदची सुट्टी असल्याने सकाळपासूनच अजिंठा लेणी येथे पर्यटकांची गर्दी झाली होती. सकाळच्या सत्रात लेणीतील सर्व दैनंदिन व्यवहार शांततेत पार पडत असतानाच दुपारी लेणी क्रमांक 10 च्या परिसरात मधमाश्यांनी अचानक चवताळून पर्यटकांवर झडप घातली.
अचानक झालेल्या हल्ल्यामुळे घाबरलेले पर्यटक सैरावैरा धावू लागले. सुमारे अर्धा तास मधमाश्यांचे हे तांडव सुरू राहिले. त्यानंतर अनेक पर्यटकांनी अजिंठा लेणीतून सप्तकुंड धबधबा परिसराकडे धाव घेतली. त्यामुळे सप्तकुंड परिसरात पर्यटकांची गर्दी झाली. त्यातच दुपारी 4.30 च्या सुमारास सप्तकुंड धबधबा परिसरात अन्य एका आग्या मोहळाने पर्यटकांवर हल्ला चढविल्याने या ठिकाणी ही अनेक पर्यटक जखमी झाल्याचे दिसून आले. अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत असल्याने अजिंठा लेणी प्रशासनावर पर्यटकांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. तातडीने योग्य उपाययोजना न झाल्यास भविष्यात गंभीर परिणाम भोगावे लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.