सोलापूर : जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या नूतनीकरण व सुशोभीकरणाच्या कामास नुकतीच सुरुवात झाली आहे. याठिकाणी असलेला बसवेश्वरांचा पुुतळा काढून ठेवायचा कोठे? हा गहन प्रश्न महापालिका प्रशासनासमोर होता, हा विषय धार्मिक आणि संवेदनशिल असल्याने पुतळा सुुरक्षेची जबाबदारी बसव ब्रिगेडने आपल्या खांद्यावर घेत महापालिकेच्या मदतीला धावली. प्रशासनाकडून तसे अधिकृत पत्र बसव ब्रिगेडचे अध्यक्ष अमित रोडगे यांना दिले आहे. एका खासगी संस्थेला असे पत्र देण्याची इतिहासात पहिली घटना असल्याचे बोलले जात आहे.
जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर यांचा पूर्णाकृती पुतळा 1985 मध्ये श्री काशी जगद्गुरू डॉ. श्री चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी यांच्या हस्ते व तत्कालीन केंद्रीय मंत्री शिवराज पाटील-चाकूरकर, सुशीलकुमार शिंदे, माजी महापौर बंडप्पा मुनाळे यांच्या उपस्थितीत झाले होते. पुतळ्यास 40 वर्षे पूर्ण झाली होती. त्यामुळे पुतळ्याचे नूतनीकरण व परिसर सुशोभीकरण करण्याचे काम हाती घेतले होते. यासाठी आ. विजयकुमार देशमुख यांनी महापालिका मूलभूत सोयीसुविधा या उपक्रमातून 25 लाख, तर शिवसेना जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून 40 लाख रुपये निधी मिळवून दिला आहे, वर्कऑर्डर काढून कामाचा मक्ता देण्यात आला आहे.
महात्मा बसवेश्वर यांचा पूर्णाकृती पुतळा काढून कोठे ठेवायचा, हा मोठा प्रश्न महापालिका प्रशासनासमोर होता. हा विषय संवेदनशिल आणि धार्मिक असल्याने लोकभावनांचा विचार करुन हे काम करावे लागणार होते. पुुतळ्याच्या सुरक्षेची जबाबदारी घेण्यास कोणी तयार नव्हते. पालिका प्रशासन व ठेकेदारांसमोर मोठा पेच निर्माण झाला होता. काम लवकर चालू करून वेळेत पूर्ण करायचे होते. त्यामुुळे महापालिकेने बसव ब्रिगेडचे अध्यक्ष अमित रोडगे यांच्याशी संपर्क साधला. रोडगे यांनी तत्परता दाखवली, महापालिकेचे अधिकारी आणि समाज बांधवांशी चर्चा करून योगदान देण्यास बसव ब्रिगेड तयार झाल्याने हे पत्र नगरअभियंता विभागाकडून संघटनेला सुपूर्द केले आहे.
महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याचे सुशोभीकरणाचे काम चालू आहे. सुनील बेत यांना काम देण्यात आले आहे. काम चालू झाल्यापासून पुतळा हलवणे, मूर्तिकार यांच्या वर्कशॉपमध्ये पुुतळा ठेवणे, काम पूर्ण झाल्यानंतर सदरचा पुतळा आणून बसवण्याची जबाबदारी आपण स्वत: घेतली आहे, असा पत्रात उल्लेख आहे.
धार्मिक आणि संवेदनशील विषय असल्याने महापालिका प्रशासनासमोर मोठा पेच निर्माण झाला होता. मला विचारणा केल्यानंतर समाज बांधव व ज्येष्ठ व्यक्ती, अनुभवी इंजिनिअर यांच्याची चर्चा करून पुतळा काढून पुन्हा बसवण्याची जबाबदारी घेतली. सुुरक्षितपणे पुतळा काढून मुळेगाव रोडवरील एका मूर्तिकारांच्या गोडाऊनमध्ये सुरक्षित ठेवला आहे.
अमित रोडगे, अध्यक्ष, बसव ब्रिगेड