

बार्शी : गणेश गोडसे
तालुक्याच्या दक्षिण बार्शी भागातील तडवळे (या) या गावासह तालुक्यातील देवी भक्तांचे श्रद्धास्थान व ग्रामदैवत श्री भगवतीदेवीचे जागृत मंदिर आहे. नवसाला पावणारी आई म्हणून भक्तांची श्रध्दा आहे.
तडवळेसह तालुक्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेले येथील श्री भगवतीदेवीचे मंदिर हे खुप पुरातन आहे. तब्बल तीनशे वर्षापूर्वीचे हे मंदिर असल्याचे पुरावे उपलब्ध असल्याने मंदिराची प्राचिनता लक्षात येऊ शकते. सोलापूर जिल्ह्यासह पंचक्रोशीतील भाविकांची देवीवर मोठी श्रद्धा आहे. मंदिरात नवरात्र महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. नवरात्र महोत्सवानिमित्त श्री भगवती देवीची गावात मोठी यात्रा भरते. यात्रेला बार्शी तालुक्यातील हजारो भाविक दर्शनासाठी हजेरी लावत असतात. हे मंदिर तडवळे या गावाच्या पश्चिम दिशेला आहे. उत्तरेकडून दक्षिण दिशेला भोगावती नदी वाहत असल्याने हे नयनरम्य चित्र सर्वानाच मोहीम करत असते.
तत्कालीन महंत बल्लाळ हे नित्यदिन भोगावती नदीच्या विस्तीर्ण पात्रामध्ये स्नानासाठी जात असत. एके दिवशी महंत नदी पात्रामध्ये स्नान करीत असताना त्यांच्या हातामध्ये अचानक एक देवीची मूर्ती आली. आपल्याला स्वतः देवीने हातावर येऊन कौल दिल्याचा विचार मनात करूण महंत यांनी त्या मिळून आलेल्या देवीच्या अद्भुत मूर्तीची विधिवत पूजाअर्चा करून आई 'राजा उदो उदो' च्या गजरात गावात आणून मूर्तीची मनोभावे प्रतिष्ठापना केली अशी आख्यायिका सांगितली जाते..
मूर्तीच्या उजवीकडील चार हातामध्ये भाता, सुदर्शन चक्र, खड्ग व त्रिशूल ही आयुधे आहेत तर डावीकडील हातामध्ये शंख, ढाल, धनुष्य व दैत्याची शेंडी धरलेली आहे. देवीच्या उजव्या पायाजवळ शरण आलेले तीन दैत्य आहेत.
देवीने गळयात, कानात, हातात, कमरेस व पायात विविध अलंकार धारण केले आहे. दररोज गावामधून देवीचा छबिना श्रद्धापुर्वक काढला जातो. विजयादशमीच्या दिवशी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास देवीची गावामधून पालखी मिरवणूक काढण्यात येते. तसेच पोर्णिमेच्या दिवशी पहाटेच्या सुमारास देवीला झोपेतून उठवुण 'आई राजा उदो उदो' च्या गजरात देवीला सिंहासणावर बसवले जाते.
अष्टभुजा स्वरुपातील देवी मूर्ती
भगवती देवीची मूर्ती ही शिवकालीन स्वयंभू आहे. शालीग्राम सारखी मऊ गुळगुळीत चल स्वरूपाची असून दोन फूट उंचीची आहे. भगवतीदेवी अष्टभुजा असून सिंहासणावर आरूढ होऊन दैत्याबरोबर युद्ध करीत असल्याची मूर्ती आहे.