

बार्शी : तालुक्यातील काटेगाव येथे आरोग्य व्यवस्थेतील गंभीर निष्काळजीपणा पुन्हा एकदा उघडकीस आला आहे. 38 वर्षीय रमीज उर्फ राजू उमर पटेल यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
घटनास्थळापासून अगदी जवळ असलेल्या काटेगाव आरोग्य उपकेंद्रात त्यावेळी डॉक्टरच उपस्थित नसल्याची बाब समोर आली आहे. तातडीची वैद्यकीय मदत मिळाली नसल्याने रुग्णाला उपचारांअभावी जीव गमवावा लागल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. वेळेत उपचार मिळाले असते तर त्यांचा जीव वाचू शकला असता, अशी चर्चा ग्रामस्थांतून होत आहे.
काटेगाव येथील आरोग्य उपकेंद्र हे केवळ नावालाच कार्यरत असून प्रत्यक्षात ते ‘खोळंबा केंद्र’ बनल्याची तीव्र टीका नागरिकांकडून होत आहे. डॉक्टरांच्या गैरहजेरीबाबत यापूर्वीही अनेकदा तक्रारी करूनही प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.संबंधित प्रकाराची चौकशी करावी, अशी मागणी केली जात आहे.