

बार्शी : ग्रामसेवक प्रकाश बाविस्कर (वय 49) यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी वरिष्ठ संशयित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर बाविस्कर यांच्या नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला.
दरम्यान, प्रकाश यांची मुलगी दिव्या प्रकाश बाविस्कर (वय 24, रा. संबरतनगर, गाडेगाव रोड बार्शी) यांनी बार्शी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यात म्हटले आहे की, कार्यालयातील अधिकाऱ्यांनी अतिरिक्त पैसे मागून अफरातफरीच्या गुन्ह्यामध्ये अडकवून नोकरीवरून काढून टाकण्याच्या वारंवार धमक्या देऊन प्रचंड मानसिक त्रास दिला, त्या त्रासाला कंटाळून माझे वडील प्रकाश बाविस्कर यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यावरून प्रकाश यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात संशयित वरिष्ठ अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुलगी दिव्याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आई, भाऊ आणि ती स्वतः हे सर्वजण वडील प्रकाश यांच्यासह एकत्रित राहातात. प्रकाश हे माढा तालुक्यातील अंबड येथे सहा महिन्यापासुन ग्रामपंचायत अधिकारी म्हणून कार्यरत होते. दि. 19 नोव्हेंबर 2025 ला त्यांच्या वडीलांची तब्येत खराब असल्याने ते घरीच होते. त्यादिवशी दुपारी दीड चे सुमारास वडिलांच्या व आईच्या मोबाईलवर पप्पांच्या कार्यालयामधून अधिकाऱ्यांचा फोन आला होता. तेव्हा पप्पा समोरच्या व्यक्तीला म्हणाले की, माझी तब्येत ठीक नाही तुम्हीच साहेबांशी बोलून घ्या. त्यावर फिर्यादी पप्पांच्या शेजारीच असल्याने पप्पांच्या मोबाईलवरुन आवाज आला की साहेब तुम्हालाच यावे लागेल. त्यावर पप्पा म्हणाले की मी येवू शकत नाही. तरीही एक तासाभरात येण्याचा प्रयत्न करतो असे म्हणून पप्पांनी फोन ठेवून दिला. तेव्हा मी पप्पांना विचारले की कोणाचा फोन होता? काय झाले? त्यावर पप्पांनी सांगितले की, विस्तार अधिकारी अक्षय शेंडगे यांचा मला फोन येत आहे की, भुजबळ साहेब आले आहेत. ते मला तात्काळ ऑफीसमध्ये भेटण्यासाठी बोलवत आहेत.
त्यांनतर पप्पा तणावात असल्याचे लक्षात आल्यावर मी व आईने पप्पांना विचारले की काय झाले? तेव्हा पप्पा म्हणाले होते की, मी या आगोदर पैसे दिलेले आहेत. तरीही कार्यालयातील अधिकारी मला पुन्हा पैसे मागत आहेत. मी आता कोठून पैसे देणार. मला फोनवर वारंवार पैशाची मागणी करत आहेत, ऑफीसमध्ये माझे अधिकारी मला नोकरीवरुन काढून टाकण्याची धमकी देत आहेत. तसेच अफरातफरीच्या गुन्ह्यात मला अडकवून नोकरीवरुन काढून टाकतो, असे धमकावतात. मी माझे काम प्रामाणीकपणे करतो.
तरीही, मला ते जाणीवपूर्वक मानसीक त्रास देत आहेत. या त्रासाला मी कंटाळलो आहे. त्यावर मी व आईने वडीलांना खूप समजावून सांगितले. त्यानंतर मी अभ्यासासाठी व आई अंगणात होती. त्यावेळी दुपारी अडीचच्या सुमारास आईला घरात आवाज आल्याने आई धावत घरात आली. तेव्हा तिला पप्पांनी किचन मधील सिलिंग फॅनला पांढऱ्या दोरीने गळफास लावून घेतलेला दिसला. त्यामुळे आईने पप्पांच्या पायाला पकडून वर उचलून ढकलत मला मोठ्याने आवाज दिला. त्या आरडाओरड्याने आजुबाजुचे लोक पळत. तेव्हा पप्पांनी किचनमधील फॅनला गळफास घेतला होता व आईने पप्पांना उचलून धरले होते. तेव्हा मी किचनमधील चाकुने पप्पांच्या गळयाची दोरी कापली. जखमी अवस्थेमध्ये पप्पांना बार्शीतील खासगी रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, मंगळवारी रात्री त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे माझे वडील प्रकाश भगवान बाविस्कर यांना आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यास त्यांच्या कार्यालयातील अधिकारी कारणीभूत आहेत. अधिक तपास पोलीस उप निरीक्षक बाळासाहेब जाधव हे करत आहेत.
गुन्हा दाखल झाल्यावर घेतला मृतदेह ताब्यात
या प्रकरणी दोषी वरिष्ठ अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा नातेवाईक व ग्राम पंचायत अधिकारी संघटनेने घेतला. यामुळे सकाळपासून ग्रामीण रुग्णालयात वातावरण तणावपूर्ण झाले होते. अखेर सायंकाळी पाच वाजता संशयित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला.