

बार्शी : येथे अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या 21 वर्षीय विद्यार्थिनीचे अपहरण केले. तिचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली, जबरदस्तीने विवाह करीत शारीरिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या प्रकरणी पीडित विद्यार्थिनीने दिलेल्या फिर्यादीवरून बार्शी तालुका पोलिस ठाण्यात एकूण 9 जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीत म्हटले आहे की, ती इंजिनीअरींगचे शिक्षण घेत आहे. गणेश टेकाळे (रा. अलिपूररोड, माऊली चौक, बार्शी) व सुरज मोरे (रा. गोरमाळे ता. बार्शी) यांची कॉलेजमध्ये ओळख झाली. यात सुरज मोरे याच्याशी मैत्री संबंध झाले. 6 मार्चला दुपारी साडेबाराच्या सुमारास तरूणी कॉलेजला जात होती. त्यावेळी तेथे गणेश टेकाळे हा चारचाकी (गाडी नं. 13 1246 ) मधून आला. तुझे व सुरज मोरे याचे व्हिडिओ, फोटो माझ्याकडे आहेत. तू माझ्यासोबत सुरज मोरे याचेकडे चल, तो काय म्हणतो त्याप्रमाणे कर. नाहीतर मी तुझे व्हिडिओ व्हायरल करीन, अशी धमकी दिली.
पीडिता घाबरून जाऊन गाडीत बसली. गणेश टेकाळे याने कार येरमाळामार्गे बीड येथील एका गल्लीत घेवून गेला. तेथे अजून एकजण गाडीत बसला. त्यांनी तरूणीला अहिल्यानगर येथे नेले. यानंतर सोलापूर-नाशिक रोडवर गाडी थांबवली. दुसऱ्या पांढऱ्या इर्टिगा गाडीतून सुरज मोरे व त्याचे सोबत दोघेजण असे आले. तेथे सुरज मोरे याने गाडीत माझ्यासोबत गुपचुप बस, तुझे व्हिडिओ माझ्याकडे आहेत, तू जर नाही आली तर व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल करणार असा दम दिला. त्यामुळे ती त्याचे गाडीत बसली. त्यानंतर घेऊन जाऊन विवाह करत अत्याचार केला असे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक दिलीप ढेरे करीत आहेत.