

सोलापूर : जर तुमच्या बँक खात्यात फक्त एकच नॉमिनी असेल, तर आता तुमच्याकडे चार लोकांना वारसदार म्हणून नियुक्त करण्याची संधी आहे. केंद्र सरकार एक नोव्हेंबरपासून बँक खात्यांमध्ये नॉमिनीबाबत नवा नियम लागू करणार आहे. या बदलामुळे ग्राहकांना अधिक लवचिकता मिळणार असून, कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत क्लेम सेटलमेंट (दाव्यांचा निपटारा) अधिक सोपे आणि पारदर्शक होणार आहे.
बँकिंग कायदे (दुरुस्ती) अधिनियम एक नोव्हेंबरपासून लागू होतील. या अधिनियमामध्ये नॉमिनीशी संबंधित नवीन तरतुदींचा समावेश आहे. यानुसार, कोणताही बँक ग्राहक आता आपले खाते, लॉकर किंवा सुरक्षित ठेवलेल्या वस्तू यासाठी जास्तीत जास्त चार नॉमिनी निवडू शकतो.
नव्या तरतुदीनुसार, ग्राहक आपल्या बँक खात्यात एकाच वेळी किंवा क्रमाने अशा दोन प्रकारे चार लोकांना नॉमिनी बनवू शकतो. जर एखाद्या ग्राहकाने चार नॉमिनी निवडले आणि पहिला नॉमिनी हयात नसेल, तर स्वयंचलितपणे दुसरा नॉमिनी हक्कदार बनेल. लॉकर आणि सुरक्षित ठेवलेल्या वस्तूंसाठी फक्त क्रमिक नामांकनालाच परवानगी असेल. म्हणजे, एका नॉमिनीच्या निधनानंतरच पुढच्या नॉमिनीला अधिकार मिळेल.
एकसाथ नामांकन
ग्राहक हवे असल्यास चारही नॉमिनींमध्ये हिश्श्याची टक्केवारी ठरवू शकतो, जसे की 40 टक्के, 30 टक्के, 20 टक्के आणि 10 टक्के जेणेकरून एकूण बेरीज 100 टक्के होईल आणि भविष्यात कोणत्याही वादाची शक्यता राहणार नाही. बँक खात्यांसाठी ग्राहक या दोन्हीपैकी कोणताही पर्याय निवडू शकतात.