सोलापुरात डॉ. बाबासाहेबांचा शतकपूर्व शिक्षणयज्ञ

Dr.Babasaheb ambedkar jayanti Special: डॉ. आंबेडकरांनी देशातील पहिले वसतिगृह सुरू केले मिलिंद नगरमध्ये
Dr.Babasaheb ambedkar jayanti 2025
सोलापूर : मिलिंद नगरमध्ये असलेले वसतिगृह.pudhari photo
Published on
Updated on
सोलापूर : विजय थोरात

शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. एकदा ते प्यायले की, तो गुरगुरल्याशिवाय राहत नाही, असे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले आहे. शिक्षणाचे महत्व माहिती असल्याने डॉ. आंबेडकरांनी प्रत्येकास शिक्षण घेण्याचे आवाहन केले होते. याच धर्तीवर देशातील पहिले वसतिगृह सोलापुरात बहिष्कृत हितकारणी सभेच्यावतीने सुरू केले. हे वसतीगृह एक जानेवारी 1925 मध्ये सुरु केले.

वसतिगृहाची सुरुवात सोलापुरातील थोरला महारवाडा (आजचे मिलिंद नगर) येथे उत्तरेकडे तोंड असलेल्या भागात 15 बाय 20 च्या तक्यात झाली. त्याच्या डाव्या बाजूस मोकळी जागा, त्याच्या बाजूस विठ्ठल मंदिर, एक खोली आणि सर्वात शेवटी तालीम होती. या जागेत डॉ. आंबेडकरांनी वसतिगृह सुरू केले. एक जानेवारी 2025 ला या घटनेला 100 वर्ष पूर्ण झाली आहेत. डॉ. आंबेडकर म्हणत मी माझ्या सामाजिक कार्याची मुहूर्तमेढ सोलापुरातून रोवली आहे.

अस्पृश्य, मागासवर्गीय मुलांच्या शिक्षणाची सोय व्हावी यासाठी डॉ. आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली 1932 मध्ये बॅकवर्ड क्लास नावाने मुलांचे हॉस्टेल (वसतिगृह) तत्कालीन नगराध्यक्ष डॉ. विनायकराव मुळे यांच्या सहकार्याने सुरू झाले. तर मुलींच्या शिक्षणाची सोय व्हावी यासाठी 1936 साली बॅकवर्ड क्लास गर्ल्स हॉस्टेल सुरू केले. ही दोन्ही हॉस्टेल्स डिप्रेशन क्लास या संस्थेच्या माध्यमातून चालवली जात होती. आजही 93 वर्षाच्या कालावधीनंतर ही दोन्ही हॉस्टेल सुरू आहेत. दरम्यानच्या काळात तत्कालीन नगराध्यक्ष दादासाहेब डॉ. विनायक मुळे व त्यांचे धाकटे बंधू डॉ. भालचंद्र मुळे यांच्याबरोबर डॉ. आंबेडकर यांची घनिष्ठ मैत्री झाली. थोरल्या राजवाड्यातील वसतिगृहाच्या माध्यमातून अस्पृश्य, मागासवर्गीय मुलांना प्रगतीचे द्वार खुले झाले. दरम्यानच्या काळात सोलापुरात हिंदू-मुस्लिम धर्मांध दंगल पेटली.

त्यावेळी वसतिगृहाच्या संचालकांचे असे म्हणणे होते की, सदरच्या वसतिगृहातील अस्पृश्य विद्यार्थ्यांनी हिंदूंच्या बाजूने दंगलीत उतरावे. परंतु, वसतिगृहाचे निरीक्षक ऐदाळे यांनी या घटनेची बाबासाहेबांकडे विचारणा केल्यावर बाबासाहेबांनी विद्यार्थ्यांनी आपली भूमिका तटस्थ ठेवावी असा निरोप दिला. तोच राग मनात ठेवून नगरपालिकेने या वसतिगृहाचे अनुदान बंद केले. ही गोष्ट बाबासाहेबांना कळताच त्यांनी ही घटना ’सायमन कमिशन’समोर मांडली आणि येथील वसतिगृह पुन्हा सुरू करावे अशी विनंती केल्याची माहिती सोलापूरचे ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत दत्ता गायकवाड यांनी त्यांच्या चैतन्याचे प्रणेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर या पुस्तकात संदर्भासह दिली आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाज उद्धारासाठी शिक्षणाला महत्व दिले. समाजातील जुन्या चालीरिती अंधश्रद्धा घालविण्यासाठी सर्वप्रथम समाजाला शिक्षित केले पाहिजे, यासाठी त्यांनी शाळा, वसतिगृह सुरू केले. त्यातून देशातील पहिले वसतिगृह सोलापुरात सुरु झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक कार्याची सर्वप्रथम सुरुवात सोलापुरातून केली आहे.

दत्ता गायकवाड, ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत

मिलिंद नगरला बाबासाहेबांचे चरण लागले आहेत. हे लहानपणापासून ऐकत माझ्यासारखे अनेक तरुण आपल्या आयुष्यात आमुलाग्र बदल घडवून आणत आहेत. त्यातच छत्रपती शाहू राजे प्रतिष्ठानच्यावतीने यंदाच्या वर्षी अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी स्थापनेच्या शंभराव्या वर्षीचा देखावा सादर करीत आहोत. विद्यार्थी प्रेमी बाबासाहेब आणि विद्यार्थ्यांप्रती असलेला बाबासाहेबांचा जिव्हाळा यातून आम्ही सबंध महाराष्ट्राला दाखवणार आहोत.

अनुराग सुतकर,आंबेडकरवादी युवक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news