Solapur News | 'तुमच्या अंगावरचे कपडेही आम्हीच दिले'; लोणीकरांच्या वक्तव्याने केममध्ये संतापाचा उद्रेक, प्रतिमेला जोडे मारो आंदोलन

Solapur News
Solapur News Pudhari Photo
Published on
Updated on

केम : भाजपचे आमदार आणि माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी शेतकऱ्यांविषयी केलेल्या एका वादग्रस्त वक्तव्याचे तीव्र पडसाद करमाळा तालुक्यात उमटले आहेत. लोणीकर यांच्या वक्तव्याने संतप्त झालेल्या प्रहार जनशक्ती पक्ष आणि केम ग्रामस्थांनी एकत्र येत त्यांच्या प्रतिमेला जोडे मारून आणि जोरदार घोषणाबाजी करत 'प्रहार स्टाईल'ने निषेध नोंदवला.

नेमकं काय म्हणाले होते लोणीकर?

आमदार बबनराव लोणीकर यांनी एका जाहीर सभेत बोलताना, "तुझ्या बापाला पेरणीचे पैसे पंतप्रधान मोदींनी दिलेत. तुझ्या आईला, बहिणीला व बायकोला लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आम्ही पैसे देतो. तुमच्या अंगावरचे कपडे, बूट आणि चपलाही आम्हीच दिल्यात," असे वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप आहे. या वक्तव्यामुळे शेतकरी वर्गात संतापाची लाट पसरली आहे.

प्रहारचा इशारा: 'जगाचा बाप शेतकरी आहे'

लोणीकर यांच्या या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी प्रहार संघटना आणि केममधील ग्रामस्थ आक्रमक झाले. त्यांनी लोणीकरांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करत आपला संताप व्यक्त केला. यावेळी बोलताना प्रहार संघटनेचे करमाळा तालुकाध्यक्ष संदीप तळेकर यांनी सत्तेची मस्ती आल्याने लोणीकर असे बोलत असल्याचा आरोप केला.

आमच्याच मतावर तू आणि तुझा बाप निवडून येतो; संदीप तळेकर

संदीप तळेकर पुढे म्हणाले, "आमच्या घामाच्या पैशावर हा देश चालतो, आम्ही अन्नधान्य पिकवतो आणि आमच्याच मतावर तू आणि तुझा बाप निवडून येतो. बबनराव, मोदी तुझा बाप असेल, पण या जगाचा बाप शेतकरी आहे, हे लक्षात ठेव. आम्ही अन्न पिकवतो म्हणून तुम्ही सर्वजण खाता," अशा तीव्र शब्दांत त्यांनी लोणीकर यांच्यावर टीका केली. या आंदोलनात प्रहारचे जिल्हा सरचिटणीस बापू नेते तळेकर, एपी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष अच्युत काका पाटील, उपसरपंच सागर कुरडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सागर दोंड, ग्रामपंचायत सदस्य विजयसिंह ओहोळ यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news