

पंढरपूर : प्रचंड विरोधानंतरही राष्ट्रमाता जिजामाता उद्यानाच्या सुशोभीकरणाचे उद्घाटन आ. समाधान आवताडे, माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते करण्यात आले. तत्पुर्वी तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या नगरसेवकांनी निकृष्ठ दर्जाची कामे झाली आहेत. अनेक कामे अपूर्ण असून भ्रष्टाचार झाला आहे. त्यामुळे उद्घाटन करु नये, अशी भुमिका घेत गेटवर जोरदार घोषणाबाजी केली.
मात्र, आ. आवताडे यांनी उद्यानाची अनेक कामे सुरु आहेत. मात्र, उन्हाळ्याच्या पार्श्वभुमिवर नागरिकांसाठी उद्यान सुरु होणे गरजेचे आहे. अपुरी कामे पुर्ण करण्यात येणार असल्याचे सांगीतले. विकास कामे करताना पायात पाय घालण्यापेक्षा हातात हात घालून कामे करुयात, असा सल्ला देखील विरोधकांना दिला आहे.
सोमवारी नगरपालिकेच्या जिजामाता उद्यानाच्या लोकार्पण सोहळ्याची निमंत्रण पत्रिका समाज माध्यमांवर झळकली. त्यामुळे उद्यानाच्या उद्घाटनावरून तीर्थक्षेत्र विकास आघाडी आणि भाजपा मधील वाद समोर आला आहे. मनसे नेते आणि तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या नगरसेवकांनी या उद्घाटन कार्यक्रमास विरोध दर्शवला. पत्रकार परिषद घेत ठेकेदार व अधिकाऱ्याला पाठीशी घालत असल्याचा आरोपही करण्यात आला.
सायंकाळी 5.30 वा. उद्घाटन कार्यस्थळी विरोधकांनी आंदोलन करत विरोध दर्शवला. त्यामुळे चांगलेच वातावरण तापले होते. अखेर विरोधी नगरसेवकांचे म्हणणे, तक्रारी आ. आवताडे व प्रशांत परिचारक, उपनगराध्यक्ष महादेव धोत्रे यांनी जाणून घेतल्या. ठेकेदाराला पाठीशी घालणार नाही. अपूर्ण कामे पुर्ण करण्यात येणार आहेत.ठेकेदाराकडून अहवाल मागवण्यात येणार असल्याचे सांगताच विरोधी नगरसेवकांचा विरोध मावळला. यावेळी सर्व नगरसेवक उपस्थित होते.