

सोलापूर : दिव्यांग व्यक्ती अस्मिता अभियान अंतर्गत जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणासाठी आणि त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच शासनाच्या विविध योजनेच्या लाभासाठी दिव्यांगत्व प्रमाणपत्र आवश्यक आहे. हे प्रमाणपत्र त्यांना सहजरित्या उपलब्ध व्हावे यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या मार्गदर्शनाखाली दिव्यांग व्यक्ती अस्मिता अभियान राबविण्यात आले. जिल्ह्यात दिव्यांग बांधवासाठी अस्मिता अभियान यशस्वी झाले असून जिल्ह्यातील 12 हजार 666 पात्र लाभार्थींना विशेष प्रमाणपत्राचे घरपोच वाटप करण्यात येणार आहे.
जिल्ह्याचे हे भौगोलिक आवाहन लक्षात घेता जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, मोहिमेचे नोडल अधिकारी तथा जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले, जिल्हा समाजकल्याण अधिकार, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता, शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी आणि मिशन इन्स्टिट्यूट ट्रेनिंग रिसर्च अँड एक्शन( मित्र) संस्थेचे अध्यक्ष अभिजित राऊत, सचिव संजय पुसाम यांच्या सहकार्याने संपूर्ण जिल्ह्यात शासन आपल्या दारी ही मोहिम राबविली गेली. या मोहिमेची तिन टप्प्यांत विभागणी करण्यात आली. पहिल्या टप्प्यात गटविकास अधिकारी, तहसीलदार, मुख्याधिकारी, ग्रामसेवक, सरपंच, आशा ताई, अंगणवाडी सेविका, समग्र शिक्षण अभियान, राष्ट्रीय बाल विकास प्रकल्प, पालक संघटना, दिव्यांग व्यक्तींच्या क्षेत्रात काम करणार्या स्वयंसेवी संस्था, संघटना यांचे सहकार्य लाभले.
पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात ज्या व्यक्तींजवळ नविन दिव्यांगत्व प्रमाणपत्र नाही अशा एकूण 15 हजार 666 दिव्यांग व्यक्तींची प्राथमिक माहिती प्राप्त केली. तसेच समग्र शिक्षा अंतर्गत0-18 वयोगटातील शिक्षण घेणार्या एकूण 1010 बौधिक अक्षम बालकांसाठी 43 बुद्धिगुणांक प्रामथिक तपासणी शिबिरे घेण्यात आली. दुसर्या टप्प्यात जिल्ह्यातील 11 तालुक्यांमध्ये 38 दिवसांत 25 शिबिरांची मोहिम यातून राबविली गेली. विशेष म्हणजे यात तब्बल 15हजार 666 दिव्यांग बांधवांची प्राथमिक तपासणी पूर्ण होऊ शकली. यातून पात्र ठरलेल्या 12 हजार 666 लाभार्थी दिव्यांग बांधवांना पुढील 60 ते 90 दिवसांमध्ये आता दिव्यांग प्रमाणपत्र घरपोच उपलब्ध होऊ शकणार आहे. केंद्रीय सामाजिक न्याय विभागाने घेतलेल्या पुढाकारातून 2018 मध्ये जिल्हा पातळीवर युनिव्हर्सल आयडी फॉर डिसॅबलिटी (युडीआयडी) प्रणाली सुरू झाली. 2011 च्या जनगनणेनुसार सोलापूर जिल्ह्यात 1 लक्ष 16 हजार दिव्यांग व्यक्त आहेत. ज्यामध्ये 68 टक्के ग्रामीण भागात तर 32 टक्के शहरी भागात राहतात. या मोहिमेच्या माध्यमातून सोलापूर वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा सामान्य रुग्णालयाने मागील गेल्या पाच वर्षांत फक्त 40 हजार दिव्यांग बांधवांना प्रमाणपत्र वाटप केले गेले.