

सोलापूर : खासगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक निवासी आश्रमशाळेत आता पवित्र पोर्टलमधून शिक्षकांची निवड करण्यात येणार आहे. तसा आदेश शासनाने काढला आहे. त्यामुळे संस्थाचालकांच्या मनमानी कारभाराला चाप बसणार आहे. त्यामुळे भावी शिक्षकांतून या निर्णयाचे स्वागत होत आहे.
राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमधील शिक्षकांच्या रिक्त पदावर शिक्षकांना समान न्याय मिळावा, यासाठी शासनाने आश्रमशाळेतील शिक्षकांची निवड पवित्र पोर्टलद्वारे करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अनेक उमेदवारांना न्याय मिळणार असल्याने भावी शिक्षकांतून आनंद व्यक्त केला जात आहे.
आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढावी, यासाठी गुणवत्ताधारक शिक्षकांची गरज आहे. त्यामुळे शासनाने पवित्र पोर्टलमधून शिक्षकांची रिक्त पदावर निवड करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पात्र शिक्षकांना आश्रमशाळेत भरती होण्याची संधी मिळणार आहे. तसेच शिक्षण सेवक म्हणून गुणवत्ताधारक शिक्षकांची निवड होणार असून, आश्रमशाळेतील शैक्षणिक गुणवत्ता वाढण्यास मदत होणार आहे.
संच मान्यतेनुसार भरली जाणार पदे
राज्यातील खासगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या निवासी आश्रमशाळा, विद्यानिकेतन आश्रमशाळांची प्रारंभी संच मान्यता पूर्ण करण्यात येणार आहे. संच मान्यतानुसार अतिरिक्त शिक्षकांचे प्राधान्याने समायोजन करण्यात येणार आहे. त्यानंतर रिक्त पदावर पवित्र पोर्टलद्वारे शिक्षकांच्या जागा भरण्यात येणार आहेत.