

सोलापूर : आषाढी वारीनिमित्त विविध जिल्ह्यांतून सोलापूर जिल्ह्यात पालख्या दाखल होत असतात. या पालख्यांसोबत आलेल्या वारकर्यांचे आपल्या कुटुंबाशी कनेक्ट राहावे, यासाठी जिल्हा परिषदेकडून पालखी मार्गावर पाच ऊर्जा वाहनांची सोय केली आहे. एका व्हॅनमध्ये एकावेळाला शंभर मोबाईल चार्जिंग लावता येणार आहेत. त्यामुळे पालखी सोबतचे वारकरी कुटुंबासोबत कनेक्ट राहणार आहेत.
मानाच्या पालख्यांबरोबर पायी चालत येणार्या वारकर्यांना आपल्या कुटुंबाची ख्याली-खुशाली विचारण्यासाठी व्यत्यय येऊ नये. यासाठी मोबाईलला चार्जिंग करण्यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या संकल्पनेतून पंढरीच्या दारी वारकरी मोबाईल चार्जिंग करण्यासाठी पाच ऊर्जा वाहनांची व्यवस्था केली आहे. संतांच्या पालख्यांबरोबर अनेक वारकरी दुरून येत असतात. बरेच दिवस ते कुटुंबापासून दूर राहतात. दिवसभर चालून थकल्यावर संध्याकाळी मुक्कामाच्या ठिकाणी निवार्याला आल्यावर कुटुंबांशी त्यांचा संपर्क व्हावा, यासाठी मोबाईलला चार्जिंगची व्यवस्था करण्यात आली आहे.
पालखी सोहळ्याबरोबरचे वारकरी व दिंडीप्रमुखांना कचरा संकलित करण्यासाठी प्लास्टिक पिशव्या देण्यात येणार आहेत. याद्वारे कचरा संकलित केला जाणार आहे. तसेच ठिकठिकाणी कचराकुंड्या उभारण्यात येणार आहेत. ग्रामपंचायतीच्या घंटागाड्यांमार्फत ग्रीन शेडमध्ये कचरा संकलित करून विल्हेवाट लावली जाणार आहे. वारकर्यांच्या सुविधेसाठी राबणारे कर्मचारी व स्वयंसेवकांना पावसापासून संरक्षण मिळवण्यासाठी रेनकोट देण्यात येणार आहेत. तीन पाळीमध्ये कर्मचारी काम करणार आहेत.