

सोलापूर : ‘गण गण गणात बोते’ असा जयघोष, हरिनाम-टाळ मृदगांचा गजर, आकाशातून होणारी पुष्पवृष्टी, हजारो भाविकांची उपस्थिती अशा भक्तिमय वातावरणात सद्गुरू प्रभाकर महाराज आणि श्री संत गजानन महाराज यांच्या पालखीचा नयनरम्य सोहळा सोलापूरकरांनी अनुभवला.
रविवारी (दि. 29) श्री गजानन महाराज यांच्या पालखीचे आषाढीवारीनिमित्त सोलापूर शहरात आगमन झाले. दुपारी पावणे एक वाजण्याच्या सुमारास श्रींच्या पालखीचे सम्राट चौक येथील सद्गुरू प्रभाकर महाराज मठात आगमन झाल्यानंतर सर्वांनी गुलाब पुष्पवृष्टी करून स्वागत केले. दरम्यान, मृद व जलसंधारनमंत्री संजय राठोड यांनी गजानन महाराज यांच्या पालखीचे दर्शन घेतले. त्यानंतर भक्तिमय वातावरणात दोन्ही संतांच्या पालखी भेटीचा सोहळा पार पडला. महाआरती होऊन गजानन महाराजांना पिठलं-भाकरीचा नैवैद्य दाखविण्यात आला. शेगावीचा राणा श्री गजानन महाराज यांच्यासोबत आलेल्या सुमारे 700 वारकर्यांनी महाप्रसाद घेतला. त्यानंतर उपस्थित भाविकांनी मनोभावे दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतला. सुमारे 10 हजारहून अधिक भाविकांची गर्दी होती. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास पालखी कुचन प्रशालेकडे मुक्कामासाठी रवाना झाली.
यावेळी श्री सद्गुरु प्रभाकर महाराज स्वामी महाराज मंदिर सार्वजनिक ट्रस्टचे मुख्य ट्रस्टी मोहन बोड्डू, व्यवस्थापकीय ट्रस्टी बाळकृष्ण शिंगाडे, वामन वाघचवरे, वसंतराव बंडगर, उदय वैद्य, रवि गुंड, रामकृष्ण कटकधोंड, सोमनाथ राऊत, रमेश देशमुख, निरंजन दंतकाळे आदी उपस्थित होते.