

सोलापूर : आषाढी शुद्ध एकादशी २५ जुलै रोजी आहे. या अनुषंगाने मानाच्या पालख्या १६ जुलै पासून सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करतात. त्यावेळी त्यांच्या मुक्काम, रिंगण, विसाव्याच्या ठिकाणी तसेच रस्ते मार्गावर त्यांना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही याचा समन्वय साधण्यासाठी प्रत्येक मानाच्या पालखीसाठी एका नोडल अधिकाऱ्याची व त्यांना सहाय्यक अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केलेल्या आहेत. सर्व अधिकाऱ्यांनी पालखी प्रमुखाशी समन्वय ठेवून सोपवलेली जबाबदारी एक "टीम वर्क" म्हणून पार पाडून वारी यशस्वी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांनी केले.
अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी कार्तीकेयन दूरदृश्य प्रणालीद्वारे मार्गदर्शन करत होते. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी, उपजिल्हाधिकारी संतोषकुमार देशमुख, अमोलसिंह भोसले, सुमित शिंदे, नगरपालिका प्रशासन सह आयुक्त आशिष लोकरे, तहसीलदार सैफन शेख, तहसीलदार सरस्वती पाटील, जिल्हाधिकारी कार्यालयात तर सर्व नियुक्त केलेले अधिकारी ऑनलाईन उपस्थित होते.
नोडल अधिकारी करणार पालखीचे स्वागत
पालखी सोलापूर जिल्ह्यात आल्यानंतर पालखी समवेत राहून पालखीच्या मुक्काम, विसावा रिंगण या ठिकाणाला भेटी द्याव्यात. तसेच रस्ते मार्गाची पाहणी करावी. पाहणी दरम्यान अडचणी असतील त्याबाबतची माहिती तात्काळ प्रशासनाला कळवावी. तसेच पालखी सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करताना संबंधित नोडल अधिकारी यांनी पालखीचे यथोचित स्वागत करण्याबाबतचे निर्देश जिल्हाधिकारी एस.कार्तिकेयन यांनी दिले आहेत.
१२ अधिकाऱ्यांची नियुक्ती
स्वतंत्र दोन टीम च्या माध्यमातून १२ अधिकाऱ्यांची नियुक्ती केलेली आहे. या अधिकाऱ्यांनी श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी व श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासोबत पुणे येथून राहून मुक्कामाच्या ठिकाणी पुरवठादारने दिलेल्या शौचालयाची पाहणी करावी ते व्यवस्थित आहेत का याची खात्री करावी तसेच एका ठिकाणाहून पुढच्या ठिकाणी ते योग्य वेळेत पोहोचले पाहिजेत या दृष्टीने त्यांच्याशी संवाद ठेवून कार्य करणे बंधनकारक असल्याचे जिल्हाधिकारी कार्तीकेयन यांनी सांगितले.